बिले कमी करण्यासाठी कार्यालयात गर्दी; अधिकाऱ्यांना विचारला जाब…
सावंतवाडी ता.२८: चुकीच्या पद्धतीने काढलेली वाढीव बिले कमी करण्यासाठी ग्राहकांची विद्युत वितरणच्या कार्यालयात मोठी गर्दी होत आहे.कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन होणारी गर्दी कमी करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत,अशी मागणी आज येथील नागरिकांच्या वतीने विज अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.यावेळी वाढीव बिलासंदर्भात ग्राहकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यालयाच्या बाहेर स्वतंत्र टेबल लावून सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन केले जाईल,याची खबरदारी घेऊ,असे आश्वासन विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले.येथील नागरिकांनी आज वाढीव बिलासंदर्भात विद्युत वितरणला घेराव घालत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
यावेळी नगरसेवक राजू बेग,विलास जाधव,दिलीप भालेकर,संतोष कासार,सर्फराज दुर्वे, मनसोर खावसा,मोहम्मद शेख,नजीर शेख,मोहम्मद सावकार,प्रताप घाडगे, प्रतिक्षा घाडगे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
कोरोनाच्या काळातील बिले काही नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने भरली आहेत.मात्र भरलेल्या बिलाची रक्कम पुन्हा नव्या बिलात जोडून दिल्यामुळे ती रक्कम कमी करण्यासाठी नागरिक कार्यालयात येत आहेत.तर विद्युत वितरण विभागाने ही चूक अनेक ग्राहकांच्या बाबतीत केल्यामुळे कार्यालयात मोठी गर्दी होत आहे.आधीच कोरोनाचा वाढता संसर्ग त्यात चुकीच्या पद्धतीने काढण्यात आलेल्या बिलामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.त्यामुळे ही बीले पुन्हा देण्यात यावी,अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.