त्या चौघांची अधिक्षकांकडे मागणी; राजकारणात काही जण प्रकरण वाढवत असल्याचा आरोप…
सिंधुदूर्गनगरी,ता.२८: आडेली धरणात बुडून मृत्यू पावलेल्या मळगाव येथील “त्या” युवकांच्या मृत्यू प्रकरणात राजकारण घुसले आहे.त्यामुळे संबधीत काही लोक आमच्यावर नाहक आरोप करीत आहेत.त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी कराच,अशी मागणी संबधित प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या त्या युवकांनी जिल्हा पोलिस अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम यांच्याकडे केली आहे.
दरम्यान संबधीत दोघे तरुण आमच्या जिवाभावाचे मित्र होते. त्यामुळे आम्ही त्यांचा घातपात कसा करणार?,असा उलट प्रश्न त्यांनी केला असून,पोलिसांनी केलेल्या कोणत्याही चौकशीस आम्ही तयार आहोत,असे त्यांनी म्हटले आहे.या प्रकरणानंतर संबधीत मृत युवकांची बहीण दिव्या कांबळी यांनी आडेली धरणात बुडून मृत झालेल्या अमोल मळगावकर व मिलींद जाधव या दोन्ही युवकांच्या मृत्यूचे त्याचे मित्रच जबाबदार असल्याचा आरोप केला होता. तसेच त्यांनी पुर्वनियोजित कट करून आपल्या भावासह त्याच्या सहकार्याचा घातपात केला,असा त्यांनी आरोप केला होता. तसेच या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली होती.
मात्र या पार्श्वभूमिवर या प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या संजय जाधव,उमाजी जाधव,लक्ष्मण जाधव आणि गोपाळ जाधव या चौघांनी आज जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे आपले म्हणणे सादर केले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.तसेच आपण त्यासाठी सहकार्य करू,असे म्हटले आहे.