बांदा, ता. २९ : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बांदा शहरात विनामास्क फिरणाऱ्या १५ नागरिकांना १०० रुपये प्रमाणे एकूण १५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
बांदा पोलिस व बांदा ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना दंड आकारण्यास सुरवात करण्यात आली आहे. मंगळवारी बांदा ग्रामपंचायतमध्ये झालेल्या कोरोना कृती समितीच्या सभेमध्ये शहरात विनामास्क फीरणाऱ्या नागरिकांना दंड आकारण्याबाबत ठराव घेण्यात आला होता. त्याचप्रमाणे १४ दिवस संस्थांत्मक क्वारंटाईन मध्ये राहणे बंधनकारक असल्याचे ठरवण्यात आले आहे. यापूर्वी शासनाकडून सांगण्यात येत आहे की शहरात व गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक असताना सुद्धा काही नागरिक नियम धाब्यावर बसवुन बाजारपेठेमध्ये विनामास्क फिरताना दिसतात. यावर बांदा सरपंच अक्रम खान यांनी जाहीर केले होते की, बाजारपेठेमध्ये विनामास्क फिरताना आढळल्यास दंड आकारण्यात येणार आहे. तरी सुद्धा काही नागरिकांना यांचे गांभीर्य नसल्याने अशाप्रकारे विनामास्क फिरताना दिसत आहे. यावर बांदा ग्रामपंचायत व बांदा पोलिस यांच्यामार्फत दंड आकारण्याची कारवाई करण्यात येत आहे.