उच्च न्यायालयात जामीन फेटाळला ; सावंतवाडीत घडले होते प्रकरण
सावंतवाडी.ता,३०: कारागृहात असलेला कैदी राजेश गावकर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी वादात सापडलेला येथील कारागृहाचा अधीक्षक योगेश पाटील याला कधीही अटक होण्याची शक्यता आहे.
अटकपूर्व जामिनासाठी त्याने उच्च न्यायालयात केलेला अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे. त्याच्या समवेत सुभेदार झिलबा पांढरमिसे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा प्रकार १९ डिसेंबर ला घडला होता. प्रथमदर्शनी त्याचा आजारपणाने मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.परंतु याबाबत कारागृहातील काही कैद्यांनी माहिती दिल्यानंतर सर्व प्रकार उघड झाला होता.पण शवविच्छेदन अहवालात मृताच्या अंगावर तब्बल १६ जखमा असल्याचे दिसून आले होते.
हे प्रकरण मनसेचे नेते परशुराम उपरकर यांनी लावून धरले होते. पाटील याला या प्रकरणी अटक करण्यात यावी,अशी त्यांनी मागणी केली.त्यामुळे या प्रकरणाची जोरदार चर्चा होती.