आनंद नेवगींची नगराध्यक्षांकडे मागणी; परजिल्ह्यातून येणाऱ्या व्यापाऱ्यांची रोजच्यारोज तपासणी करा…
सावंतवाडी ता.३०: येथील पालिकेच्या संत गाडगेबाबा भाजी मंडईत परप्रांतीयांना जागा न देता प्रथम स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे,अशी मागणी नगरसेवक आनंद नेवगी यांनी नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यातून येणाऱ्या भाजी व फळ विक्रेत्यांची रोजच्या रोज तपासणी करण्यात यावी,अन्यथा त्यांना याठिकाणी येण्यास प्रवेश बंदी करावी,असेही त्यात म्हटले आहे.याबाबतचे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
यावेळी महेश पांचाळ,विलास सावंत,दिलीप भालेकर, केतन आजगावकर आदी उपस्थित होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे,सावंतवाडी शहरात कोणताही धंदा असो प्रत्येक धंद्यात स्थानिक न दिसता प्रथम परप्रांतीयच दिसत आहेत.हे परप्रांतीयच नंतर डोईजड होतात,याची अनेक उदाहरणे डोळ्यासमोर आहेत.म्हणूनच शहरातील भाजी मंडईतसुद्धा प्रथम स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे.आज जो भाजीपाला शहरात येतो तो बेळगाव,कोल्हापूर या भागातूनच येत आहे.या भागात सध्या कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे.भाजीच्या वाहनांबरोबर येणारे ड्रायव्हर,क्लीनर हे परप्रांतीय असुन त्यांचा ई-पास तपासणे तसेच त्यांची नाक्यावर थर्मल गन लावून टेंपरेचर चेक करण्यात यावे,आता तर फळे, फुले तसेच फुलांची तोरणे,अगरबत्त्या घेऊन परप्रांतीयच उतरतील एक तर त्यांची रोजच्या रोज टेस्ट केली जावी,अन्यथा त्यांना प्रवेश बंदी करावी,जर असे परप्रांतीय कुठेही भाड्याने राहत असतील तर त्या संबंधित घरमालकांनी त्यांची माहिती नगरपालिकेस देणे जरुरीचे आहे.या लोकांमुळे शहरात कोरोना ची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही,जर का अशा लोकांची माहिती घरमालकांनी दिली नाही तर त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात यावी,असे म्हटले आहे.