अनारोजीन लोबो; आईची उपमा दिल्यामुळे चुकीचे काम करू देणार नाही…
सावंतवाडी,ता.३०: नगराध्यक्ष संजू परब हे मला आईसारखे मानत असतील तर त्यांनी भाजी व्यावसायिक आणि स्टाॅल धारकांबाबत कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये, दोन वर्षात चांगले काम करावे.लोकांचे आशीर्वाद घ्यावेत, ते चुकीचे वागतील असे मी काम त्यांच्याकडून होऊ देणार नाही. असा पलटवार सावंतवाडीच्या ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.”स्टॉल हटाव” मोहिमेदरम्यान झालेल्या टीकाटिपणी नंतर नगरसेविका लोबो या माझ्या आई समान आहेत.त्यामुळे त्यांच्याविरोधात मी काही बोलणार नाही,असा दावा नगराध्यक्ष परब यांनी केला होता. हाच धागा पकडून नगरसेविका लोबो यांनी आज पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष संजू परब यांना चिमटा काढला.
यावेळी लोबो म्हणाल्या,श्री परब हे मला आईसारखे मानत असतील तर त्यांना कोणतेही चुकीचे काम मी करू देणार नाही.स्टॉलधारका बाबत त्यांनी घेतलेली भूमिका ही अतिशय चुकीची आहे.त्यामुळे त्याबाबत त्यांनी पुनर्विचार करावा. आपल्या नगराध्यक्षपदाच्या दोन वर्षाच्या कालावधीत त्यांनी चांगले काम करावे लोकांचे आशीर्वाद घ्यावेत. चतुर्थीच्या तोंडावर स्टॉल हटाव सारखी मोहीम राबवून त्यांनी कोणाच्या पोटावर मारू नये,असाही सल्ला यावेळी त्यांनी दिला. यावेळी त्यांनी परब यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली.एकीकडे नगराध्यक्ष म्हणून शहरातील स्टॉल हटवण्यासाठी काम करत आहेत.मात्र दुसरीकडे काही स्टॉल नव्याने उभारण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यामुळे या दोन्ही गोष्टी त्यांचे दुटप्पी भूमिका उघड होत आहे. त्यामुळे येणाऱ्या पंधरा दिवसात नव्याने उभारण्यात आलेले स्टॉल काढून न टाकल्यास आम्ही शिवसेना म्हणून तीव्र आंदोलन करू,असा इशारा लोबो यांनी दिला आहे.यावेळी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, नगरसेवक अनोरोजीन लोबो, बाबू कुडतरकर,शिब्बीर मणियार,सुरेंद्र बांदेकर,अपर्णा कोठावळे, शुभांगी सुकी,भारती मोरे,प्रशांत कोठावळे,दीपाली सावंत,श्रुतिका दळवी आदी उपस्थित होते.