आशिष सुभेदारांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी; पुनर्वसन केलेले स्टॉल नेमके कुणासाठी…?
सावंतवाडी ता.३०: येथील भाजी मंडईत शेतमाल विकण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे केली आहे.दरम्यान पालिकेने पुनर्वसन केलेले स्टॉल नेमके कुणासाठी?,असा सवाल त्यांनी उपस्थित केला.तर याबाबत कार्यवाही न झाल्यास स्थानिक व्यापाऱ्यांना घेऊन मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू,असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.याबाबतचे पत्रक त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
त्यात असे म्हटले आहे की,शहरात बाहेरील भाजी विक्रेत्यांचा वावर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.सध्या श्रावण मास चालू आहे.तसेच गणेश चतुर्थीचा सण सुद्धा ऐन तोंडावर येवून ठेपला आहे,त्यामुळे आता भाजीपाल्याची आवक वाढली आहे.आधीच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीने स्थानिक शेतकरी होरपळून निघाला आहे.त्यातच शेतमाल उत्पादित करूनही बाजारपेठ उपलब्ध नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा सवाल ऐरणीवर आला आहे.त्यामुळे आपल्या स्थानिक शेतकऱ्यांना जर शेतमाल विक्रीसाठी येथील भाजी मंडईत जागा उपलब्ध दिली,तर त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे.तसेच आरोग्य,कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिक्रमण ही बाब अतिशय गंभीर आहे.परंतु शासन निर्धारित सर्व अटी व नियमांचे काटेकोरपणे पालन करून या स्थानिक शेतकऱ्यांना शेतमाल विकणे करीता बाजारपेठेतचं जागा उपलब्ध करून द्यावी,ज्याप्रकारे आपण काही व्यापाऱ्यांना पुनर्वसन करून देत आहात त्याचप्रमाणे शेतमाल विकणार्यांना सुद्धा बाजारपेठेत जागेचे पुनर्वसन करून द्यावे,असे म्हटले आहे.