महेंद्र सांगेलकर; “ते” व्हिडिओ पुन्हा व्हायरल करून बेगडी प्रेम दाखवा…
सावंतवाडी ता.३०: सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवून सावंतवाडीचे नगराध्यक्ष व पालिकेचे सत्ताधारी भाजी व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत,असा आरोप काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केला आहे.दरम्यान निवडणुकीपूर्वी भाजीवाल्यांचे दुःख दाखवणारे व्हिडिओ व्हायरल करून मते मिळवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आता पुन्हा ते व्हिडिओ व्हायरल करून आपले बेगडी प्रेम नागरिकांना दाखवून द्यावे,असाही टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.याबाबत श्री.सांगेलकर यांनी प्रसिद्धी पत्र दिले.
यात त्यांनी असे नमूद केले आहे की,नगरपरिषद हद्दीतील भाजी विक्रेते व या मार्केटमधील छोट्या व्यापाऱ्यांची व्हिडिओ व्हायरल करून नगराध्यक्षपद व सत्ता मिळविली.आता त्यावेळीचे ते भाजीविक्रेत्यांचे व्हिडिओ व्हायरल करून सावंतवाडीकरांना भाजीविक्रेत्यांवरील बेगडी प्रेम दाखवावे.कोरोना सारखा महामारी रोग सावंतवाडीत घुसलेला असताना भाजपा सारखा जबाबदार पक्ष व त्यांचे नेते नगराध्यक्ष नगरसेवक भाजी मार्केटमध्ये २०० ते २५० भाजी विक्रेत्यांना सोशल डिस्टंसिंगचा भंग करून व आपत्ती व्यवस्थापन कायदा हाती घेऊन कोरोनाला ऐन गणेश चतुर्थी मध्ये निमंत्रण देत आहेत.कष्टकरी भाजीविक्रेत्या ४० ते १०० रुपये प्रतिदिन कराच्या पैशांवर सावंतवाडी नगरपालिका चालविली जाते. त्याच कष्टकरी होरपळलेल्या भाजी विक्रेत्यांच्या दुकानावर व जागांवर हातोडा मारला जात आहे.
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्था कोलमडली असताना व गरीब,शोषित,पिडीत लोकांवर उपासमारीची वेळ आली असताना सावंतवाडी नगर परिषदेने गरीब भाजीविक्रेते व छोटे व्यापारी हटविल्याने त्यांची उपासमार होत आहे.एका बाजूने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे नाटक करायचे व दुसर्या बाजूने यात गरीब,गरजू,शोषित भाजी विक्रेत्यांवर कारवाई करायची,ही बाब निषेधार्थ आहे.सावंतवाडी तालुका काँग्रेस सावंतवाडीतील सर्व गरीब, शोषित, पीडित भाजीविक्रेत्यांच्या पाठीशी आहे.प्रसंगी रस्त्यावर उतरून काँग्रेस पक्ष भाजी विक्रेत्यांना न्याय मिळवून देईल.



