ग्रामस्थ सतप्त; सभापती अनुश्री कांबळींकडून अधिकाऱ्यांची कान उघडणी..
वेंगुर्ले ता.३०: आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व चालक निवासस्थान, पार्किंग शेड व कमान बांधकाम ही सुमारे १५ लाख निधी खर्च होऊन झालेली कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत.या प्रकारामुळे आडेली ग्रामस्थ संतप्त झाले.तत्काळ पंचायत समितीच्या सभापती अनुश्री कांबळी यांनी केंद्राला भेट दिली.तसेच जि. प. बांधकाम विभागाचे ज्युनिअर इंजिनिअर यांना तातडीने बोलावून निकृष्ट कामे पूर्ण करा,अशा सक्त सूचना दिल्या. दरम्यान १५ ऑगस्ट पूर्वी हे काम सुस्थितीत न झाल्यास ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विकास योजनेअंतर्गत सार्वजनिक आरोग्य विकासखाली या प्राथमिक आरोग्य केंद्रात पार्किंग शेड व कमान बांधणे सुमारे ६ लाख रुपये तसेच वैद्यकीय अधिकारी वर्ग २ व चालक निवासस्थान दुरुस्ती करणे सुमारे ९ लाख रुपये ही तीनही कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. त्यामुळे आडेलीतील ग्रामस्थ संतप्त झाले. या तीनही कामांची वेंगुर्ले पंचायत समितीच्या सभापती अनुश्री कांबळी यांनी पहाणी केली. तसेच या कामाचे बांधकाम विभागाचे जूनियर इंजीनियर श्री. पवार यांना बोलाऊन चांगलेच धारेवर धरले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सर्व निकृष्ट कामे ही १५ ऑगस्ट पूर्वी पुर्ण करा अशा सूचना त्यांना दिल्या. सदर कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण न झाल्यास आडेलीतील ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.
या बांधकामात वापरलेले पेव्हर ब्लॉक हे काही दिवसातच उखडले आहेत या पेव्हर ब्लॉक खाली वापरलेली वाळू यामधून पाणी झिरपत असल्याने झऱ्याप्रमाणे पाणी वाहत आहे. तर काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक फुटले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर उभारलेली कमान यालाही ही तडा गेला आहे. निकृष्ट बांधकाम कशा पद्धतीने झाले यावर ग्रामस्थांनी जिल्हा; परिषद ज्युनिअर इंजिनिअर यांना चांगलेच धारेवर धरले. वैद्यकीय अधिकारी या इमारती करीता वापरण्यातआलेला रंग हासुद्धा निकृष्ट दर्जाचा असल्याने इमारतीच्या भिंती वर पाणी पडत असल्याने सर्व भिंतीला सिमेंटला तडे जाऊन रंग निकृष्ट वापरल्याने रंग पावसाच्या पाण्याने वाहत आहे. गॅरेज ईमारत करता लावण्यात आलेले गेट हेही ही भंगारातील सामानाने तयार केल्याचे ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. छतातून येणारे पाणी हे थेट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुतिकागृह व कार्यालय इमारतीवर पडत असल्याने कार्यालयातील दस्तऐवज भिजण्याची भीती निर्माण झाली आहे. तर सुतिकागृह नवजात बालके व त्यांची आई याच्यावर ते पाणी पडत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण सध्या करोना महामारी चे संकट असल्याने सभापती सौ. कांबळी यांनी या सर्व घटनेची दखल घेत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. या कामाची पडताळणी न करता पूर्ण बिले ग्रामसेवक यांनी अदा केल्याने त्यांनाही सभापतींनी चांगलेच धारेवर धरले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती सुनील मोरजकर, पं. स. सदस्या साक्षी कुबल, आडेली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रकाश गडेकर, सामाजिक कार्यकर्ते नितीन मांजरेकर, सचिन गडेकर माजी सरपंच भारत धर्णे, प्रवीण धर्णे, घनःश्याम नाईक, सदस्य संतोष कासले, सदस्य प्रशांत मुंडये, उमेश केळुसकर, गंगाधर गोवेकर तंटामुक्त अध्यक्ष आदी उपस्थित होते.