बनावट पास प्रकरण ; संशयितास उद्या न्यायालयात हजर करणार…
मालवण, ता. ३० : बनावट प्रवासी पास प्रकरणी येथील पोलिसांनी नालासोपारा पालघर येथून मुख्य संशयितास ताब्यात घेतले आहे. दरम्यान संशयित शहाबाद अलम अब्दुल सलाम (वय- २१) रा. मूळ रा. उत्तरप्रदेश याची कोरोना टेस्ट करून त्याला येथे आणण्यात आले आहे. याबाबतचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी दिली.
मुंबई क्राईम ब्रँच व सिंधुदुर्ग पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बनावट पास प्रकरणी तालुक्यातील हडी येथून तिघांना ताब्यात घेतले होते. बनावट पास प्रकरणी दुसऱ्या प्रकरणात येथील पोलिसांनी सर्फराज हसन शेख याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत शहाबाद याने बनावट पास बनवून दिल्याचे समोर आले. त्यानंतर येथील पोलिस उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांच्या पथकाने शहाबाद याला ताब्यात घेतले. त्याचे नालासोपारा येथे पॅनकार्ड काढून देणे व अन्य स्टेशनरी दुकान आहे. त्याचा लॅपटॉप व मोबाईल जप्त करण्यात आला आहे. शाहबाद याने सर्फराज याला तीन बनावट पास दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
सर्फराज यांची पोलिस कोठडी मुदत संपल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मुंबई येथून ताब्यात घेतलेल्या शहाबाद याच्याकडे अधिक चौकशी सुरू आहे. उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.