रणजित देसाई ; दर्जा तपासल्याशिवाय रस्ता वाहतुकीसाठी खुला करू नका
कुडाळ.ता,३१: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे नव्याने करण्यात आलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे.कणकवली येथे झालेला प्रकार लक्षात घेता.याचा प्रत्यय येत आहे.तोपर्यंत हा दर्जा तपासला जात नाही,तोपर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करू नये,अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केली आहे.याबाबत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
भर पावसात कुडाळ शहरात सुरू असलेले काम हे देखील निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. भंगसाळ नदीवरील पूल, त्याला बांधण्यात आलेला संरक्षक कठडा व ओव्हरब्रिज भरावाचे काम हे देखील अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने भविष्यात येथे देखील मोठा धोका उद्भवू शकतो. कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर काम पूर्ण करून कंपनीला इथून गाशा गुंडाळण्याचा असल्याने हे काम दिवस-रात्र सुरू आहे. या कामावरती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कोणतेही अधिकारी देखरेखीसाठी व दर्जा तपासण्यासाठी हजर नसतात. कुडाळ शहरात करण्यात आलेले काम हे देखील अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. अनेक ठिकाणी संरक्षक भिंती कोसळल्या आहेत. वेताळ-बांबर्डे पुलावर भराव वाहून गेल्याने एक मोठा खड्डा पडला आहे. पाण्याचे पारंपारिक प्रवाह बदलल्याने यावर्षी पहिल्याच पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले. त्यामुळे शेती बागायती व घरांचे देखील फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तरी या कामाची केंद्रीय स्तरावरून सखोल चौकशी करण्यात यावी व जोपर्यंत कामाच्या दर्जाची खात्री होत नाही. तोपर्यंत सदर महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येऊ नये,अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केली आहे.