Tuesday, March 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याजिल्ह्यात "मिशन बिगीन अगेन" अंतर्गत कार्यवाही सुरु...

जिल्ह्यात “मिशन बिगीन अगेन” अंतर्गत कार्यवाही सुरु…

के. मंजुलक्ष्मी ; नियम शिथील, पण लॉकडाऊन ३१ ऑगस्ट पर्यंत राहणार….

सिंधुदुर्गनगरी.ता,३१: मिशन बिगीन अगेन अंतर्गत जिल्ह्यात काही नियम शिथील करण्यात आले आहेत. तसेच लॉकडाऊनचा कालावधी ३१ ऑगस्ट २०२० रोजी पर्यंत वाढविण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
या मिशन बिगीन अगेन अंतर्गत पुढील प्रमाणे सेवा, अटी व शर्तींसह नियमांचे पालन करून सुरू राहणार आहेत. यापूर्वी परवानगी देण्यात आलेली दुकाने, सेवेची ठिकाणे सुरू राहणार आहेत. जिल्ह्याअंतर्गत बससेवा जास्तीत जास्त ५० टक्के क्षमतेने, सामाजिक अंतर, निर्जंतुकीकरण व स्वच्छता विषयक उपाययोजना याच्या अधिन राहून सुरू राहतील, जिल्हा बंदी कायम असून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पूर्वी प्रमाणेच निर्बंध लागू राहतील. जिल्ह्यातील बाजारपेठा, दुकाने सकाळी ९.०० ते सायं. ७.०० या कालावधीत सुरू राहतील. मॉल आणि व्यापारी संकुले दिनांक ५ ऑगस्ट २०२० रोजीपासून सकाळी ९.०० ते सायं. ७.०० वा. पर्यंत सुरू राहतील. यामध्ये नाट्यगुहे, प्रेक्षागृहे (थेअटर्स) फुड कोर्ट व उपहारगृहे यांचा समावेश नाही. तथापी मॉल मधील उपहार गृहातील स्वयंपाकगृह फक्त घरपोच सेवेसाठी सुरू राहील. या बाबत संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थेने लागू केलेले नियम व अटी लागू राहतील. लग्न समारंभ, खुली जागा, लॉन, वातानुकुलीत नसलेले हॉल २३ जून २०२० रोजीच्या निर्बंधासह चालू राहतील. मोकळ्या मैदानावरील व्यायाम निर्बंधासह सुरू राहतील. वर्तमान पत्राची छपाई, वितरण हे घरपोच सेवेसह सुरू राहील. शैक्षणिक संस्थांची कार्यालये, कर्मचारी ( विद्यापीठे, महाविद्यालय, शाळा) शिकविण्याव्यतिरिक्त अशैक्षणिक कामकाज जसे ई-साहित्याचा विकास, उत्तपत्रिकाची मुल्यांकन, निकालाची घोषणा यासाठी सुरू राहतील. सलुन, ब्युटीपार्लस, स्पा दुकाने राज्य शासनाच्या २५ जून २०२० च्या आदेशाप्रमाणे सुरू राहतील. गोल्फ कोर्स, आऊड डोअर फायरिंग रेंज, जिमनॅस्टिक, टेनिस, मैदानी बॅडमिंटन व मल्लखांब या सारख्या मैदानी खेळांना दिनांक ५ ऑगस्ट २०२० रोजी पासून समाजिक अंतर, निर्जंतुकीकरण याच्या अधिन राहून सुरू राहतील. मात्र जलतरण तलाव चालविण्यास परवनागी असणार नाही.
नागरिकांच्या हालचाली पुढील प्रमाणे प्रवाशी सलवतीनुसार सुरू राहतील. दुचाकीवर दोन व्यक्ती मास्क व हेल्मेट सह, तीन चाकीमध्ये तीन व्यक्ती व चार चाकी वाहनामध्ये चार व्यक्ती प्रवास करू शकतील. सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, प्रवासा दरम्यान मास्क वापरणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीमधील अंतर किमान ६ फूट ठेवावे. दुकानात ग्राहकांची संख्या एकावेळी ५ पेक्षा जास्त असणार नाही व योग्य त्या सामाजिक अंतराचे पालन केले जाईल याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधीत दुकानदार व आस्थापना चालक यांची असणार आहे. गर्दी होणारे कोणतेही कार्यक्रम करणे, संमेलन, मेळावे, परिषद इ. यांना बंदी राहील. विवाहासारख्या सार्वजनिक कार्यक्रमात सामाजिक अंतर ठेऊन ५० पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहण्यास परवानगी नसेल. तसेच अंत्यविधीसाठी २० पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी असणार नाही. सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या ठिकाणी थुंकन्यास बंदी असून त्यासाठी एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, गुटखा, मद्य, धुम्रपान करण्यास मनाई आहे.
शक्य असेल तिथे वर्क फ्रॉम होम करावे. कामाच्या ठिकाणी, कार्यालय, दुकाने, बाजारपेठा व औद्यौगिक व व्यावसायिक अस्थापना येथे कामाच्या वेळेत योग्य ते अंतर ठेवावे, जेणे करून गर्दी होणार नाही. सर्व प्रवेश व निर्गम स्थानावर थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर व हात धुण्याची सुविधा उपलब्ध करावी. कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात सॅनिटायझर, हॅन्डवॉश उपलब्ध करुन देण्यात यावेत. सर्व कामाच्या ठिकाणाचे सार्वजनिक सुविधाचे आणि मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व ठिकाणाचे दोन वेळा निर्जंतुकीकरण करावे. कामाच्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळले जाईल याची दक्षता घ्यावी. कंटेन्मेंट झोनमध्ये शिथील करण्यात आलेले नियम लागू राहणार नाहीत. वरील सर्व बाबी तसेच यापूर्वीच्या आदेशाने परवानगी देण्यात आलेल्या बाबी वगळता इतर सर्व बाबी प्रतिबंधीत राहणार आहेत.
या आदेशाचे पालन न केल्यास भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments