मालवण पंचायत समितीचा अभिनव उपक्रम ; पाताडे, परुळेकर, पराडकर यांची संकल्पना…
मालवण, ता. ३१ : विविधांगी उपक्रमांनी जिल्ह्यात आपला वेगळा ठसा उमटविण्यात अग्रेसर असणाऱ्या येथील पंचायत समितीने रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने पर्यावरण समृद्ध करण्याच्या उद्देशाने ‘कोकम बी’ राखी हा अनोखा उपक्रम राबविला आहे. कोकमच्या बिया असलेल्या राख्या पंचायत समिती महिला कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आल्या आहेत. राख्यांवरील बिया परिसरात टाकल्यास किंवा योग्य जागी पुरल्यास कोकमची झाडे उगविण्यास मदत होणार आहे. सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
पंचायत समिती मासिक सभेच्या निमित्ताने सर्व सदस्यांच्या उपस्थितीत महिला कर्मचाऱ्यांना या राख्या देऊन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
निसर्गाचा समतोल हा सर्वात महत्त्वाचा आहे. निसर्ग वाचला तर आपण सर्वजण वाचणार आहोत. याच हेतूने निसर्ग समृद्ध व्हावा झाडे वाढवीत या उद्देशाने कोकम बी’ राखी ही संकल्पना राबवली जात असल्याचे सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर यांनी सांगितले.