भास्कर परब; जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने दिला इशारा…
कुडाळ ता.०१: विद्युत महावितरणने ग्राहकांना दिलेल्या भरमसाठ बिलांच्या विरोधात आपण सिंधुदुर्ग ग्राहक तक्रार मंचाच्या न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असून जनतेला लुबाडणाऱ्या महावितरणचा बुरखा जिल्हावासीयांसमोर फाडल्या शिवाय राहणार नाही,असा इशारा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भास्कर परब यांनी दिला आहे.दरम्यान जोपर्यंत महावितरण आपली चूक मान्य करून बिले दुरुस्ती करून देत नाही,तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील,असेही त्यांनी यावेळी सांगितले.याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
त्यात म्हटल्याप्रमाणे,महावितरणचे अधिकारी यांनी लाॅकडाऊनचा बाऊ करून विज ग्राहकांना लुबाडण्याचे छडयंञ आखले असून जिल्ह्य़ातील जनतेने सावध व्हावे,यासाठी विज वितरण कंपनीचे कर्मचारी घरोघरी एप्रिल,मे,जून,जुलै महिन्याचे एकञीत बिले वाटप करत आहेत.त्या बिलांचा विज ग्राहकांनी बारकाईने लक्ष देऊन अभ्यास करावा,आणि बिल भरावे की भरू नये याचा निर्णय घ्यावा.
सद्यस्थितीत वाटप करण्यात येत असलेल्या बिलामध्ये एप्रिल.मे.जून.या तीन महिन्यांचे सरासरी युनिट व त्यानुसार बिलांची रक्कम दर्शविलेली आहे.कारण या कालावधीत लाॅकडाऊन मुळे रिडींग घेतले नव्हते.आता जुलै महिन्यात विज वितरणच्या कर्मचाऱ्यांमार्फत मिटर रिडींग घेतले गेले.ते एप्रिल.मे,जून,जुलै या चार महिन्यांचे,आणि तशी बिले तयार करून ग्राहकांना देण्यात येत आहेत.एप्रिल,मे,जून ची सरासरी बिले देऊनही जुलैमध्ये पुन्हा एकञीत चार महिन्यांचे रिडिंगचा घेऊन बिले देत असून एप्रिल मे जुन ची थकबाकी म्हणून नोंद केली आहे.एप्रिल ते जुलै च्या कालावधीत बिले न भरणाऱ्या ग्राहकांना थकित म्हणण्याचा अधिकार वितरणला नाही.कारण देशातील कोरोनाच्या गंभीर परिस्थितीने बिले भरणे राहून गेले होते.त्यामुळे ग्राहकांना थकबाकीदार म्हणण्याचा अधिकार नाही.आणि तसे असेल तर सिंधूदूर्ग जिल्ह्य़ातील औद्योगिक वापराच्या काही विज ग्राहकांची अनेक वर्षे थकित असलेली थकबाकी विज वितरण कम्पनीने जाहीर करावी.
दिलेल्या बिलांची पहाणी केल्यास एप्रिल मे जुन या तीन महिन्यांचे सरासरी बिल सर्व प्रथम नोंदले आहे.आणि त्या खाली जुलै मध्ये प्रत्यक्ष रिडींग घेतलेल्या चार महिन्यांचे एकूण युनिट व एकूण बीलाची नोंद केलेली आहे.सरासरी दिलेले तीन महिन्यांचे बिल व प्रत्यक्ष जुलै महिन्यात घेतलेले चार महिन्यांच्या रिडिंगचा बारकाईने अभ्यास केल्यास जुलै महिन्यात दिलेले बिल हे ७ महिन्यांचे आहे. पण लाॅकडाऊन घोषित झाल्या पासुन जुलै पर्यंत चारच महिने ग्राहकांनी विजेचा वापर केलेला आहे.मग ७ महिन्यांचे बिल कसे,हा प्रश्न प्रत्येक विज ग्राहकाने महावितरणला विचारला पाहिजे.
जिल्ह्यातील भोळ्याभाबड्या जनतेचा गैरफायदा घेऊन जर येथिल महावितरणचे अधिकारी महावितरणची तिजोरी भरण्यासाठी गोरगरीब जनतेला लुबाडण्याचा प्रयत्न करत असतील तर खपवून घेतले जाणार नाही.असा इशारा देतानाच चुकीची बिले रद्द करून एप्रिल.मे.जून.जुलै या चार महिन्यांचे जे रिडींग जुलै मध्ये घेतले आहे.त्यानुसार फ्रेश बिले द्यावीत.जो पर्यंत महावितरण आपली चूक मान्यकरून बिले दुरूस्ती करून देत नाहीत तोपर्यंत जिल्ह्य़ात आमचा लढा सुरूच राहील.