एकावर गुन्हा दाखल; मृताच्या भावाची पोलिसात तक्रार…
सावंतवाडी ता.०१: नेमळे येथिल युवक समीर धावडे (२९),रा.एरंडवाक या युवकाने आर्थिक देवघेवीतूनच आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे दरम्यान या प्रकरणात पैशासाठी तगादा लावणार्या एका युवकावर आज येथिल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.दत्तात्रय नाईक रा.नेमळे,असे त्याचे नाव आहे.याबाबतची तक्रार मृताचा भाऊ एकनाथ धावडे यांनी सावंतवाडी पोलिसात दिली होती.त्यानुसार दत्तात्रय याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,असे तपासिक अमंलदार तथा सहाय्यक पोलिस निरिक्षक अण्णासो बाबर यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की,समीर धावडे या युवकाने झाराप-पत्रादेवी बायपासलगत असलेल्या डोंगरीवर १९ जुलै रोजी गळफास लावून आत्महत्या केली होती. दरम्यान संबंधित संशयित नाईक याने त्याच्याकडे पैसे देण्यास तगादा लावल्यामुळे मानसिक दबावाखाली त्याने आत्महत्या केली असावी,असा संशय त्याच्या भावाने पोलिसांकडे व्यक्त केला होत. त्यानुसार संबंधित संशयितांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आण्णासो बाबर करीत आहेत.