खारेपाटण चेकनाक्यावर लागल्या वाहनांच्या रांगा ; यंत्रणेवर ताण…
कणकवली, ता.१: गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईकर चाकरमान्यांचा गावाकडे येण्याचा ओघ आतापासूनच सुरू झाला आहे. त्यामुळे खारेपाटण चेकनाक्यावर वाहनांच्या दोन ते तीन किलोमिटरपर्यंत रांगा लागत आहेत. तर चेकनाक्यावर प्रवाशांची गर्दी होत असल्याने तेथील कर्मचारी आणि प्रवाशांत खटके देखील उडत आहेत. गणेशोत्सव कालावधीतही 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी असल्याने येत्या 7 ऑगस्ट पर्यंत मोठ्या संख्येने चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल होण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवासाठी अजून 20 दिवसांचा अवकाश आहे. मात्र 14 दिवस विलगीकरणात राहण्याचा नियम सर्वच ग्रामपंचायतींनी केला आहे. त्यामुळे चाकरमान्यांनी आत्तापासूनच गावी धाव घेतली आहे. गावात येणारे चाकरमानी तेथील शाळांमध्ये तसेच आपल्या बंद घरांमध्ये क्वारंटाईन होत आहेत. आज दिवसभरात सुमारे दोन हजार मुंबई, पुण्यातील चाकरमानी सिंधुदुर्गात आल्याचा अंदाज आहे.