सुरेश भोगटेंनी केली होती मागणी; प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल मानले आभार….
सावंतवाडी ता.०१: येथील चितारआळी परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर जाहीर केलेला कंटेनमेंट झोन आता कमी करून फक्त बाधितांच्या घरापासून १०० मीटर परिसरातचं ठेवण्यात आला आहे.त्यामुळे याठिकाणी असलेल्या व्यवसायिकांना व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गणेश चतुर्थी व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर संबंधित परिसरातील कंटेनमेंट झोन कमी करण्यात यावा,अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी काल प्रांताधिकारी सुशांत खांडेकर व पोलीस निरीक्ष शशिकांत खोत यांच्याकडे केली होती.दरम्यान त्या मागणीची दखल घेऊन तात्काळ हा कंटेनमेंट झोन कमी करण्यात आला आहे.
चितारआळी परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्या ठिकाणचा परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला होता.दरम्यान संबंधित परिसरात घाऊक विक्रेते,कापड दुकान,लाकडी खेळणी,इलेक्ट्रिशन,सोनार आदि व्यवसायिक असल्यामुळे त्यांच्या व्यवसायावर याचा परिणाम झाला होता.तर या ठिकाणचे सर्व मार्ग बंद केल्यामुळे घाऊक विक्रेत्यांना आपला माल बाहेर काढता येत नव्हता. त्यामुळे गणेश चतुर्थी व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर हा कंटेनमेंट झोन कमी करण्यात यावा,अशी मागणी व्यापाऱ्यांच्या वतीने श्री.भोगटे यांनी केली होती.या मागणीची संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेत कंटेनमेंट झोन कमी केला आहे.त्यामुळे येथील व्यापाऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.दरम्यान प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल नागरिक व्यापाऱ्यांसह श्री.भोगटे यांनी आभार मानले.