एम.के.गावडे : लोककलांना राज्यात व्यासपीठ मिळवुन देणार…
वेंगुर्ले,ता.०१:कोरोनाच्या साथीमुळे सर्वच कलाकार आज घरी बसले आहेत. शासनाने या कोरोना साथीत सर्वांना मदत केली मात्र दशावतार कलाकारांचा विचार झालेला दिसत नाही. त्यामुळे आता एकत्र आल्याशिवाय आमची नोंद घेतली जाणार नाही अशा भावनेने दशावतारी लोककला चालक-मालक बहुउद्देशीय संघ यांनी एम के गावडे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. यावेळी गावडे यांनी फक्त दशावतार कलेसाठी आपण पुढे न जाता जिल्ह्यातील भजन, कीर्तन, कथकली, फुघडी यासारख्या कलेला सुद्धा बरोबर घेणे गरजेचे आहे. पुढील काळात आपण जिल्ह्यातील लोककलांना राज्यात व्यासपीठ मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले त्यांनी सांगितले.
वेंगुर्ला कॅम्प येथील महिला काथ्या सभागृहात घेण्यात आलेल्या बैठकीत चालक मालक संघ, सर्व कलाकार याना एकत्र घेऊन पुढील वाटचाल करण्याचे ठरविण्यात आले. तसेच यामध्ये सर्व राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, सतिश पाटणकर, श्री. वरक अशा कलाकार प्रेमींना घेऊन लवकरच याबाबत मार्ग निश्चित करण्याचे ठरवण्यात आले. यावेळी संस्थेच्या वतीने सन १९९२ पासून सातत्याने दशावतार कलेच्या उर्जितावस्थेसाठी प्रयत्न करणारे एम. के. गावडे यांचा जेष्ठ रंगकर्मी मारुती सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर एम. के. गावडे प्रबोधिनी व चालक मालक संघ यांच्यावतीने पुरस्कार प्राप्त चेंदवणकर दशावतार कंपनीचे मालक देवेंद्र नाईक यांचा शाल, श्रीफळ, कल्पवृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना एम.के. गावडे म्हणाले की, जिल्ह्यातील अनेक नाविन्यपूर्ण गोष्टींमधील एक म्हणजे दशावतार लोककला. ही कला १९६०- ७० च्या दशकात पुढे जाणार नाही अशी अवस्था होती. त्या काळातील काही दिग्गज कलाकार, लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नाने निवृत्त कलाकारांना शासनाची पेन्शन सुरू झाली. रक्कम कमी होती मात्र दशावताराला नवसंजीवनी देण्यासाठी पुरेशी होती. अनेक सुशिक्षित तरुण या कलेकडे वळले व पारंपारिक दशावतार बरोबरच अनेक मंडळे रजिस्टर झाली. आज जिल्ह्यात किमान ९० ते १०० मंडळ कार्यरत आहेत. जिल्ह्यातील जनतेचा लोकाश्रय या कलेला मिळाला म्हणून पूर्वी दोन ते तीन महिने चालणारे नाटकांचे प्रयोग आता आठ ते दहा महिने चालतात. अनेक वेळा दशावतर मंडळांना एकत्र आणण्याचा अनेकांनी प्रयत्न केला मात्र ते कधीच होऊ शकले नाही. मात्र आज कोरोनाच्या साथीमुळे सर्वच कलाकार घरी बसले असताना आता एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. तसेच फक्त दशावतार कलेसाठी आपण पुढे न जाता जिल्ह्यातील इतर लोककला सुद्धा बरोबर घेतल्या पाहिजेत. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन जाणे हाच प्रमुख उद्देश यापुढे असेल असे श्री.गावडे यांनी सांगितले. यावेळी दशावतारी लोककला चालक-मालक बहुउद्देशीय संघ अध्यक्ष तुषार नाईक, उपाध्यक्ष नाथा नालंग, सचिव सचिन पालव, सहसचिव सुधीर कलिंगण, खजिनदार देवेंद्र नाईक यांच्या सहित दशावतार कलाकार मारुती सावंत, गौरव शिर्के, नाना प्रभु, शरद मोचेमाडकर, सुधाकर दळवी, सुवर्णकुमार मोचेमाडकर, संकेत दळवी, वैभव तोटकेकर, शांती कलिंगण, अमोल मोचेमाडकर, समीर महाडेश्वर आदी उपस्थित होते.