संजू परब; तहसिलदारांची ढवळाढवळ नको,त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवू…
सावंतवाडी ता.०१: पालिका ही स्वायत्त संस्था असल्यामुळे आम्ही केेलेल्या स्टॉल हटावच्या कारवाईत तहसिलदारांनी नाक खुपसू नये,मी नगराध्यक्ष आहे.त्यामुळे स्टॉल कोठे लावायचे हा माझा अधिकार आहे.त्यामुळे तहसिलदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवू,असा इशारा सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे.दरम्यान तहसिलदारांनी तालुक्यात आपले काम करावे,आमच्या पालिकेत ढवळाढवळ करू नये,आणि त्यांच्याकडुन तसा प्रयत्न झाल्यास आम्ही त्यांची जिल्हाधिकार्यांकडे तक्रार करू,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सावंतवाडीत झालेल्या स्टॉल हटाव कारवाईबाबत सर्व विरोधकांकडुन सोशल डीस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसविण्याचा आरोप झाल्यानंतर तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी ही कारवाई चतुर्थी पर्यत जैसे थे ठेवण्यात यावी,असे आदेश मुख्याधिकार्यांना दिले होते.दरम्यान याबाबतचे वृत्त प्रसिध्द होताच नगराध्यक्ष परब यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.
ते म्हणाले, तहसिलदारांच्या आदेशाला आम्ही केराची टोपली दाखवणार आहोत.नगरपालिका म्हणजे स्वायत्त संस्था आहे त्यामुळे त्यात ढवढाढवळ करण्याचा तहसिलदारांना संबंध नाही.त्यामुळे नको त्या गोष्टीत त्यांनी नाक खूपसू नये,तालुक्याचा विषय काय तो बघावा, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील, मी नगराध्यक्ष आहे. त्यामुळे कोणाला कोठे स्टॉल द्यायचे हे मी ठरविणार आहे.त्यांनी आपले काम करावे,आणि या विरोधात तहसिलदारांची तक्रार केली जाईल.