ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन;रस्ता बंद असल्यामुळे करावा लागतोय अधिकचा प्रवास….
बांदा.ता,०२:
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे गोवा व महाराष्ट्र राज्याच्या सिमा भागातून जाणारा बांदा-आरोसबाग-नेतर्डे रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद आहेत. बांदा बाजारपेठेवर अवलंबून असलेले डिंगणे, डोंगरपाल, गाळेल व नेतर्डे गावातील ग्रामस्थांना सहा किमीचा अधिकचा प्रवास करावा लागत असल्याने मोठ्याप्रमाणात आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदर रस्त्यावरून चारही गावातील नागरिकांना ओळखपत्रक पाहून ये-जा करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी डिंगणे ग्रुप ग्रामपंचायततर्फे सावंतवाडी तहसिलदार व बांदा पोलिस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
बांदा पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक अनिल जाधव यांना डिंगणे माजी उपसरपंच रोहित नाडकर्णी व विद्यमान उपसरपंच जयेश सावंत यांनी निवेदन दिले. पत्रादेवी लंगारबाग दत्तमंदिर जवळून बांदा-आरोसबाग-नेतर्डे असा मार्ग आहे. यामार्गे ड़िंगणे, गाळेल, ड़ोंगरपाल व नेतर्डे गावाची रहदारी मोठ्याप्रमाणावर असते. परंतु सदरचा मार्ग सद्यस्थितीत चारही गावातील ग्रामस्थांना सहा किमीचा अधिकचा प्रवास करत डिंगणे-बांबरवाडी मार्गे बांदा येथे बाजारपेठ तसेच अन्य कामासाठी जावे लागते. त्यामुळे डिंगणे-बांबरवाडी मार्गे बांदा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची कोंडी होते.
एसटी वाहतूक सेवा पूर्णपणे बंद असल्याने खाजगी वाहनांद्वारे प्रवास करावा लागत आहे. त्यात आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे बांदा-आरोसबाग-नेतर्डे रस्त्यावरून डिंगणे, गाळेल, डोंगरपाल व नेतर्डे गावातील ग्रामस्थांना ओळखपत्राची पडताळणी करून ये-जा करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी डिंगणे ग्रामपंचायततर्फे करण्यात आली आहे.