प्रमोद जठार ; रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेनेचा डबलगेम
कणकवली, ता.२: एकीकडे नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करायचा, आणि दुसरीकडे शिवसेनेच्या सामना मुखपत्रात त्याच रिफायनरी कंपनीकडून पैसे घेऊन पहिल्या पानावर जाहिराती छापायच्या, वर बिनधडक सांगायचे की हा वर्तमानपत्राच्या उत्पन्नाचा प्रश्न आहे. हे काय चाललंय? खासदार राऊत हे कोकणी माणसांना मुर्ख समजतात काय? असा प्रश्न भाजपचे प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी उपस्थित केला आहे.
श्री.जठार म्हणाले, रिफायनरी प्रकल्पाबाबत खासदार विनायक राऊत आणि शिवसेनेची मंडळी डबलगेम खेळत आहेत. मात्र यात नुकसान स्थानिकांचे होत आहे. कोरोना महामारीत कोकणातील हजारो युवक बेरोजगार झाले आहेत. त्यांच्यासाठी रिफायनरी प्रकल्प ही सुवर्णसंधी आहे. पण शिवसेना आणि खासदार राऊत यांना इथे रोजगार निर्माण करायचे नाहीत असेच दिसून येतेय.
श्री.जठार म्हणाले, मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्थानिकांना प्रकल्प हवा असेल तर त्याला आमचा विरोध नसेल अशी भूमिका घेत आहेत. या उलट नाणार प्रकल्पाला पाठिंबा देणार्या शिवसैनिकांना चप्पलांनी बडवुन काढण्याची धमकी खासदार राऊत देत आहेत. एवढेच नव्हे तर नाणारला पाठिंबा देणार्या शिवसैनिकांना पक्षातून निलंबित केले जात आहे. हा तर शिवसेना पक्षप्रमुखांच्या विचारांना आव्हान देणारा उद्दामपणा राऊत करत आहेत. शिवसैनिक म्हणजे स्थानिक जनता नव्हे का? शिवसेनेच्या उद्योगमंत्र्याने एमआयडीसीच्या माध्यमातुन जागा खरेदीची अधिसूचना काढायची, तत्पूर्वी आपल्याच बगलबच्चाना तिथल्या जागा विकत घ्या म्हणून तुम्हीच सांगायचे आणि जे समर्थन करतात त्यांना दलाल म्हणून हिणवायचे, हीच का तुमची संस्कृती? वेळोवेळी आपली भूमिका सरड्यासारखी सोईस्करपणे बदलणार्या खासदार राऊत यांनी स्वतःला कोकणचा लोकप्रतिनिधी म्हणवून घेणे खरोखरच शोभते का हे आधी स्वतःच्या मनाला विचारायला हवे.
श्री.जठार म्हणाले, 70 गावांची देवगड पंचायत समिती पाठिंब्याचा ठराव पास करते, तर खासदार महोदय लोकमताचा आदर करण्याऐवजी एका गावातील छोट्या वाडीत जाऊन मुठभर लोकांना प्रकल्पाविरोधात भडकवत फिरत आहेत. कोवीडच्या पार्श्वभुमीवर सरकारने प्रशासनाने लोकांना घरात बसा म्हणून सांगायचे 144 ,151 कलमे लाऊन जमावबंदी करायची, आणि आपण मात्र गावातील देवळामध्ये नाणार विरोधाची सभा घेऊन सोशल डिस्टन्सिंगच्या नियमासह कायद्याचे तीन-तेरा वाजवायचे! मा. मुख्यमंत्री, कायदा, प्रामाणिक शिवसैनिक, ,कोकणी बेरोजगार तरुण-तरुणी आणि जनता या सर्वांपेक्षा तुम्ही कदापीही मोठे नाहीत. एवढाच सत्तेचा माज आला असेल तर पंतप्रधान मोदीजींच्या व कोकणी जनतेच्या कृपेने मिळालेल्या खासदारकीचा राऊत यांनी ताबडतोब राजीनामा द्या व पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊन नाणारला स्थानिकांचा पाठिंबा आहे की नाही, ते पहाच असेही आव्हान श्री.जठार यांनी दिले आहे.