रुपेश राऊळ;सावंतवाडीत कोव्हीड सेंटर उभारण्याची शिवसेना नेत्यांकडे मागणी…
सावंतवाडी ता.०२: गणेश चतुर्थीच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेल्वेने येणा-या चाकरमान्यांची “रॅपीड टेस्ट” करा,अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी पालकमंत्री उदय सामंत तसेच खासदार विनायक राऊत यांच्याकडे केली आहे.दरम्यान आगामी काळात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही,त्यामुळे सावंतवाडी तालुक्यात काॅरन्टाईन सेंटर तात्काळ सुरू करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना द्या,असेही त्यांनी यावेळी सांगितले. श्री.राऊळ यांनी आज दूरध्वनीद्वारे राऊत व सामंत यांच्याशी चर्चा केली.याबाबतची माहिती त्यांनी दिली आहे.
ते म्हणाले, महामार्गावरून येणाऱ्या चाकरमान्यांची “रॅपिड टेस्ट” करण्यात येते,परंतु रेल्वेने येणाऱ्या चाकरमान्यांनाबाबत अद्यापपर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यांच्या माध्यमातून संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे प्रत्येक रेल्वे स्टेशन वर रॅपिड टेस्ट होणे महत्त्वाचे आहे.तर दुसरीकडे सावंतवाडी तालुक्यासाठी अद्याप सेंटर झालेले नाही.सांगेली येथील नवोदय विद्यालय व कास मधील अन्य जागेत हे सेंटर उभे करण्यास विरोध करण्यात आला. परंतु आयत्या वेळी रुग्ण वाढल्यास प्रशासन काय भूमिका घेणार,असा प्रश्न करून तालुक्यात हे सेंटर सुरू करण्यासाठी तात्काळ सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी द्याव्यात,अशी आपण मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.याबाबत पालकमंत्री व खासदारांनी सकारात्मक भूमिका घेऊ,असे आश्वासन दिले आहे.