दत्ता सामंत ; माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत झाली तासभर चर्चा..
मालवण.ता,०२: मी कोणावरही नाराज नाही आणि माझ्याबद्दल पक्षांतरच्या ‘त्या’ केवळ अफवाच असल्याचे कट्टर राणे समर्थक दत्ता सामंत यांनी स्पष्ट केले. श्री.सामंत गेले काही महिने राजकीय व्यासपीठापासून दूर आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री तथा भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी काल त्यांची भेट घेतली. दरम्यान माझे सामाजिक कार्य चालूच आहे. यापुढे सामाजिक व धार्मिक स्तरावर एक वेगळी संकल्पना घेऊन आपण समाजकार्य करणार असल्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
श्री.सामंत यांच्या कुंभारमाठ मालवण येथील निवासस्थानी श्री.चव्हाण यांनी घेतलेल्या भेटीत दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. यावेळी भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ पदाधिकारी भाऊ सामंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर आदी उपस्थित उपस्थित होते.
या भेटीत राजकीय, सामाजिक विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी सामंत यांनीही दिलखुलास संवाद साधला. दरम्यान आपले समाजकार्य यापुढेही कायम राहणार असल्याचे सांगत नाराज नसल्याचेही श्री.सामंत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्याबाबत उलटसुलट उठणाऱ्या अफवांना आता पूर्ण विराम मिळाला आहे.