आंबोलीत वृक्षारोपण; फळबाग कृषी उत्पन्नाला पसंती…
सावंतवाडी,ता.०२: लॉकडाउनच्या काळात हातावर हात ठेवून न बसता सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार शिवराम दळवी व त्यांचे कुटुंबीय शेतात रमले आहे. त्यांनी आपल्या शेतात विविध कृषी विषयक उत्पन्न घेवून फळलागवड सुध्दा केली आहे. दरम्यान नोकरी,धंद्याच्या मागे येथिल युवकांनी न राहता स्वयंरोजगाराच्या संधी शोधणे गरजेचे आहे. त्यासाठी फळबाग लागवड आणि शेतीसाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहन त्यांनी युुवा पिढीला केले आहे.
यावेळी बोलताना श्री.दळवी म्हणाले,आमचे सर्व कुटुंब लाॅकडाऊनच्या पुर्वसंध्येला आंबोलीत दाखल झाले. त्यावेळ पासून वेळ गप्प बसून ठेवत नव्हता,त्यामुळे काही तरी करायची इच्छा ठेवून कृषी उत्पादन व वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात भुमीपुत्र चाकरमानी दाखल झाले आहेत,ही संख्या दोन लाखांपर्यंत पोहोचली आहे.अनेकांचे रोजगार गेले आहेत.तसेच कोरोनाचे संकट आणखीच चिंता वाढवत आहे. त्यामुळे सर्व चाकरमानी लोकांनी शेती बागायती मध्ये लक्ष घालून मेहनत घेऊन,कृषी उत्पादन निर्माण करावे, असे आवाहन श्री दळवी यांनी केले.शेती, बागायती मध्ये नवनिर्माण करणारे प्रयोग करून उत्पादन घ्यावे. तसेच आंबा, काजू, बांबू, आवळा,केळी, जांभूळ, सागवान, व अन्य विविध प्रकारच्या झाडांचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहन शिवराम दळवी यांनी केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांनी जमिनीवर विविध प्रकारच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आज केरळ मधील लोकांनी येवून केलेल्या कृषी विकासाच्या संकल्पना पाहता आपल्या जमिनीत उत्पादन घेतले,तर आत्मनिर्भर होऊन स्वतः आणि कुटुंबातील व्यक्ती आर्थिकदृष्टया सक्षम होवू,अशी संकल्पना राबविली पाहिजे,असे दळवी यांनी सांगितले.कोरोनाच्या संकटामुळे गरिब श्रीमंत अशा प्रत्येक व्यक्तीला चांगला वाईट अनुभव आला आहे.त्यामुळे या अनुभवातून स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे.असा प्रयत्न करावा असे आवाहन शिवराम दळवी यांनी केले आहे.