हरी खोबरेकर ; तालुका शिवसेनेचे आयोजन, १५ हजार रक्कमेची पारितोषिके…
मालवण, ता. ३ : नारळी पौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून तालुका शिवसेनेच्या वतीने जिल्हास्तरीय ऑनलाईन कोळी नृत्य स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. अशी माहिती तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली.
प्रसिद्धी पत्रकाद्वारे खोबरेकर यांनी स्पर्धेची रुपरेषा जाहीर केली. वैयक्तिक प्रकारात होणारी ही स्पर्धा दोन गटात घेतली जाणार आहे. १५ वर्षाखालील व १५ वर्षावरील असे गट असणार आहेत. पहिला गट : प्रथम पारितोषिक २ हजार रुपये, द्वितीय १,५०० रुपये, तृतीय १ हजार रुपये. दुसरा गट : प्रथम ३ हजार रुपये, द्वितीय २ हजार रुपये, तृतीय १,५०० रुपये तसेच विजेत्यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहेत. यासह ज्या व्हिडीओला जास्त लाईक मिळतील त्या प्रत्येक गटातील एका व्हिडिओला विशेष रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे.
स्पर्धकांनी वेशभूषेसह आपले व्हिडीओ १० ऑगस्टपर्यंत ९६०७६७७४०८ या व्हाट्सएप नंबरवर पाठवावेत. तसेच आपला पासपोर्ट फोटो व नाव पत्ताही पाठवावा. पहिल्या ५० स्पर्धकांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
मान्यवर परीक्षकांद्वारे स्पर्धेचे परीक्षण होणार असून पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण केले जाणार आहेत. तरी आजपासूनच वेशभूषेसह आपले व्हिडीओ पाठवून स्पर्धेतील आपले स्थान निश्चित करावे. स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य आहे. अशी माहिती खोबरेकर यांनी दिली.