जि. प. मतदार संघ, पालिका क्षेत्रात एकाच दिवशी रक्षाबंधन, कोव्हीड योद्ध्यांचा होणार सन्मान ; लक्ष्मी पेडणेकर यांची माहिती…
मालवण, ता. ३ : तालुका महिला भाजपवतीने मसुरे येथे कोव्हीड योद्धयांचा राखी बांधून आणि कोव्हीड योद्धा प्रमाणपत्र देऊन रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.
यावेळी भाजप महिला तालुकाध्यक्ष लक्ष्मी पेडणेकर, जि. प. सदस्य सरोज परब, भाजपचे पदाधिकारी यासीन सय्यद, तात्या हिंदळेकर, शिवाजी परब उपस्थित होते. मसुरे येथे कोव्हीड योद्धे मसुरे पोलिस अधिकारी पी बी नाईक, पोलीस कॉन्स्टेबल टी. एच. जायभाय, पोलिस कॉन्स्टेबल व्हि. व्हि. फरांदे, प्रसिद्ध डॉ. सुधीर मेहेंदळे, निवृत्त माजी सैनिक मेजर जयंत तोंडवळकर, आरोग्यसेवक सिद्धेश धुरी, पत्रकार झुंजार पेडणेकर यांचा भाजप तालुका महिलांच्यावतीने कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन आणि राखी बांधून गौरव करण्यात आला.
तालुक्यातील सहा जिल्हा परिषद मतदार संघात तसेच मालवण पालिका हद्दीमध्ये अशा पद्धतीने संचार बंदी कालावधीमध्ये अतिशय उत्कृष्ट काम केलेल्या योद्ध्यांचा कोव्हीड योद्धा सन्मानपत्र आणि राखी बांधून भाजपच्या महिलांच्यावतीने गौरव करण्यात येणार आहे तसेच भारतीय जनता पक्ष हा सदैव समाजात लोकाभिमुख काम करणार्यांच्या मागे उभा असून या सर्वांच्या कार्याचा गौरव पक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे अशी माहिती महिला तालुकाध्यक्ष लक्ष्मी पेडणेकर यांनी दिली. भाजपच्या महिला यांच्यावतीने तालुक्यामध्ये व संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशाप्रकारे रक्षाबंधनाचा अनोखा कार्यक्रम सर्वत्र होणार असल्याने हा उपक्रम कौतुकास्पद असाच आहे. संचार बंदीच्या कालावधीत या सर्व योद्धानी जे योगदान दिले आहे त्याचा आम्ही समस्त भाजपच्या भगिनी गौरव करत आहोत असे सौ. परब यांनी सांगितले. तालुक्यातील सर्व जि. प. मतदार संघातही आज भाजपच्या महिला अशा पद्धतीने रक्षाबंधन साजरा करणार आहेत.