शैलेश भोगले यांची मागणी ; ः खासदार, पालकमंत्र्यांकडे मागणी
कणकवली, ता.०३ ः महामार्ग चौपदरीकरण कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. कमी दर्जाचे साहित्य तसेच अकुशल कामगारांच्या माध्यमातून उड्डाणपूल आणि संरक्षक भिंतीची कामे होत आहेत. यासर्व प्रकाराची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करा अशी मागणी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष शैलेश भोगले यांनी खासदार, पालकमंत्री आणि हायवेचे मुख्य अभियंता विनय देशपांडे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
श्री.भोगले यांनी निवेदनात म्हटले आहे की, शहरातील जानवली नदी ते एस.एम.हायस्कूल या परिसरात उड्डाणपुलाचा जोड रस्ता एप्रिल-मे महिन्यात बांधण्यात आला. मात्र हे काम अकुशल कामगारांकडून करण्यात आले. त्यामुळे पहिल्याच पावसात उड्डाणपुलाच्या जोड रस्ता भिंतीचे सिमेंट बॉक्स हलू लागले होते. ही बाब नागरिकांनी, लोकप्रतिनिधींनी लक्षात आणून दिल्यानंतरही ठोस उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे जुलै महिन्याच्या मध्याला उड्डाणपुलाचा जोड रस्ता कोसळला. त्यानंतर 31 जुलै रोजी उड्डाणपुलाचे स्लॅब सुरू असताना कोसळले. यावेळी देखील ठेकेदार दिलीप बिल्डकॉन आणि त्यावर देखरेख करणारी आर.टी.फॅक्ट कंपनीचे अभियंते, तंत्रज्ञ तेथे उपस्थित नव्हते.
महामार्ग चौपदरीकरणाचे बहुतांश सर्वच ठिकाणचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. खचलेले रस्ते डांबर आणि सिमेंटचे पॅच मारून सुस्थितीत असल्याचे दाखविले जात आहे. प्रत्यक्षात मात्र कुठल्याही भागातील रस्ता, संरक्षक भिंती खचून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिलीप बिल्डकॉनने बांधलेल्या संपूर्ण रस्त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट व्हावे. जानवली पूल ते एस.एम.हायस्कूलपर्यंत संपूर्ण उड्डाणपूल जोड रस्ता काढून तेथे नव्याने बांधकाम व्हायला हवे आदी मागण्या श्री.भोगले यांनी केल्या आहेत.