वितरणला घेराव; कार्यवाही करा,अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जा…
सावंतवाडी ता.०४: कोरोनाच्या काळातील वाढीव वीज बिलांच्या विरोधात आज माजगाव ग्रामस्थांच्यावतीने निदर्शने करण्यात आली.यावेळी विद्युत वितरणच्या अंदाधुंदी कारभाराचा निषेध करण्यात आला.दरम्यान वीज बिले कमी करण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करा,अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल,असा इशारा उपस्थित ग्रामस्थांच्यावतीने वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला.याबाबत आज विद्युत वितरणला घेराव घालण्यात आला.
यावेळी उपसरपंच संजय कानसे,डि.के.सावंत, धनश्री गावकर, रुपेश नाटेकर,विष्णू सावंत,लक्ष्मण नाईक,आबा सावंत,बाळा वेजरे,भारती कासार,संजय माजगावकर,अजय सावंत,राजेश सावंत,शिवराम परब, तुकाराम सावंत,विजय सावंत, प्रथमेश सावंत, शंकर सावंत, सखाराम तळेकर, नारायण सावंत, विनोद तळेकर, सतीश सावंत,गंगाराम सावंत,दिलीप माळकर,बाळकृष्ण चौगुले आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या काळातील वीज बिले काही ग्राहकांकडून ऑनलाइन पद्धतीने भरणा केलेली आहेत.मात्र नव्या बिलामध्ये भरलेली रक्कम थकबाकी म्हणून जमा करून ती बिले वाढवून देण्यात आली आहे.दरम्यान काहींकडून जशीच्या तशी बिले भरण्यात आली.त्यामुळे त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे.तर दुसरीकडे सर्वसामान्यांना हजाराच्या पटीत बीले आल्यामुळे त्यांना ती रक्कम भरणे अवघड बनले आहे.त्यामुळे ही वाढीव बिले कमी करण्यात यावी,अशी मागणी माजगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.तसेच वीज बिले न भरल्यास विद्युत प्रवाह खंडित करण्याची ताकीत काही वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना दिली जात आहे.त्यामुळे पहिल्यांदा वीजबिले कमी करा,व नंतरच ती भरणा करण्याची सक्ती करा,अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल,असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.