सर्वपक्षीय आक्रमक; आज सायंकाळी ४ वाजता बैठक घेवून पुढील भूमिका ठरविणार…
सावंतवाडी ता.०४: येथील भाजी मार्केटच्या एका बाजूच्या दरवाजाला काही पालिका कर्मचाऱ्यांकडून कुलूप घालण्यात आल्यामुळे गेले अनेक दिवस सुरू असलेला वाद पुन्हा पेटला.यावेळी सर्वपक्षीयांनी त्या ठिकाणी धाव घेत,काही झाले तरी आम्ही भाजी व्यावसायिकांवर अन्याय करू देणार नाही,अशी भूमिका घेतली.तसेच हे कुलूप करण्यास नेमका जबाबदार कोण?, असा प्रश्न करून मुख्याधिकार्यांना जाब विचारला.मात्र आपण कोणालाही अशा सूचना अथवा आदेश दिले नाहीत,असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.त्यामुळे उद्या या प्रश्नावरून सर्व पक्ष आंदोलन करतील,असा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत आज सायंकाळी चार वाजता बैठक घेऊन पुढील भूमिका ठरवू,असे पालिकेच्या ज्येष्ठ नेत्या अनारोजीन लोबो यांनी सांगितले. तर एकदाच काय ती आरपारची लढाई करू,असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिला आहे.
सावंतवाडी भाजी मंडई नगराध्यक्ष संजू परब यांनी स्टॉल हटाव मोहीम राबविल्यानंतर या ठिकाणी मोठे वाद झाले होते.संबंधित स्टॉलधारक व भाजी विक्रेत्यांना पूर्ववत जागेत बसवण्यात यावेत.व सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळण्यात यावा,अशी मागणी व सूचना तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी मुख्याधिकाऱ्यांना केल्या होत्या.त्यामुळे या ठिकाणी तशी कारवाई होणे अपेक्षित होते.परंतु या कारवाईकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले.उलट ज्या ठिकाणी भाजीविक्रेते बसतात, त्या मार्केटच्या एका दरवाज्याला आज पालिकेतील दोन कर्मचाऱ्यांनी येऊन अचानक कुलूप ठोकले.त्यामुळे तेथील भाजी व्यवसायिक आक्रमक झाले.त्यांनी याबाबत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना सांगितले.आमच्यावर तेथील भाजी व्यवसाय आक्रमक झाले.आमच्यावर होत असलेली कारवाई ही अन्यायकारक आहे.आधी कोरोनामुळे आम्ही रस्त्यावर आलो आहोत.त्यामुळे आता आम्हाला न्याय द्यावा,अशी मागणी त्यांनी यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांकडे केली.
यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी काही झाले तरी तुम्हाला न्याय देऊ,असे सांगितले. झालेली कारवाई लक्षात घेता शिवसेनेच्या नेत्या अनारोजीन लोबो,रुपेश राऊळ यांनी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याशी दूरध्वनी द्वारे संपर्क साधला.मात्र झालेली कारवाई आपण केलेली नाही.अशा प्रकारचे कोणतेही आदेश दिलेले नाही. उलट कारवाईला कोणी माझ्या परवानगी शिवाय मार्केटमध्ये जाऊ नये,असे आपण सक्त ताकीद दिली असल्याचे सांगितले.त्यामुळे त्याठिकाणी असलेले पदाधिकारी आणखीनच आक्रमक झाले.व संबंधित भाजी विक्रेत्यांना काही झाले तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कारवाईवर स्थगिती देण्याची तसेच संबंधितांना पूर्व जागा देण्याची मागणी केली आहे.त्यामुळे येत्या दोन दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास आम्ही आंदोलनात्मक भूमिका घेऊ,असा इशारा दिला आहे.यावेळी झालेल्या कारवाईबाबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी जोरदार नाराजी व्यक्त केली.सर्वसामान्य गोरगरीब भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर आणण्याचे काम पालिका प्रशासन व नगराध्यक्ष करत आहेत ,असे त्यांनी सांगितले. तर एकतर्फी कारवाई चुकीची आहे,असे राष्ट्रवादीचे ग्राहक सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलीक दळवी यांनी सांगितले. तर नगरपालिकेचा मनमानी कारभार करत आहे.मात्र या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागू,असा इशारा स्वराज्य संघटनेकडून देण्यात आलेला आहे.
यावेळी शहराध्यक्ष बाबू कुडतरकर,शब्बीर मणीयार, प्रतीक बांदेकर, सुरेंद्र बांदेकर, हीदायतुल्ला खान, सुनिल पेडणेकर, अमोल साटेलकर, कृष्णा धुळपणावर आदीसह भाजी विक्रेते उपस्थित होते.