अनेक ठिकाणी छपराचे नुकसान;बाजारपेठेतील एक महिला गंभीर जखमी…
सावंतवाडी ता.०४: येथे झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे गेले अनेक दिवस वादात सापडलेल्या भाजी मंडईच्या छपराचा पत्रा अंगावर कोसळून भाजी विक्रेती महिला जखमी झाली.यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.ही घटना आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.दरम्यान तिला अधिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित महिला भाजीपाला विकण्यासाठी भाजी मंडईत बसली होती.दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने मंडई वरील पत्रे उडून गेले.याच दरम्यान वार्यासोबत आलेला पत्रा संबंधित महिलेवर कोसळुन ती जखमी झाली.तर याठिकाणी असलेल्या अनेक व्यापाऱ्यांची सुद्धा पळता भुई थोडी झाली.
आज दुपारच्या सुमारास शहरात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत.यात अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे.तर अनेकांच्या घरावरची दुकानावरची छप्परे उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.तसेच येथील श्रीराम वाचन मंदिर समोर उभ्या असलेल्या कारवर तलावाकाठचे झाड कोसळल्यामुळे अपघात झाला.यात सुद्धा गाडीचे मोठे नुकसान झाले.मात्र या गाडीत असलेली एक महिला व वृद्ध सुदैवाने बचावले.दरम्यान पालिका पदाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत हे झाड बाजूला करून रस्ता पूर्ववत केला.