अतुल काळसेकर यांची माहिती ः भांडवल पुरवठ्यासह मिळणार तज्ज्ञांचे मार्गदर्शन
कणकवली, ता.4 ः सिंधुदुर्गातील अनेक शेतकरी आणि मच्छीमार मत्स्यशेतीकडे वळले आहेत. त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी भाजपने अभियान सुरू केले आहे. यात या शेतकर्यांना भांडवल पुरवठ्यासह आवश्यक ते तांत्रिक साहाय्य आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती भाजप नेते अतुल काळसेकर यांनी दिली.
श्री.काळसेकर म्हणाले, इथले शेतकरी आणि सागरी मच्छीमारी करणारे मच्छिमार अतिरिक्त उत्पन्न म्हणून मत्स्यशेती कडे पाहत आहेत. त्यातच केंद्र सरकारने आत्मनिर्भर पॅकेजमध्ये ’मत्स्यसंपदा’ विषयासाठी भरीव तरतूद केल्याने लोकांचा मत्स्यशेतीकडे कल वाढत आहे. मत्स्यपालन करणारा मत्स्य शेतकरी, पिंजर्यातील मत्स्यपालन, कातळावरील मस्त्याबिज प्रकल्प तसेच बायोफ्लाक, कोळंबी पालन, खेकडा पालन, खासगी मालकीचे नैसर्गिक व कृत्रिम तलावामधील मत्स्य बीज संवर्धन सारख्या आधुनिक मत्स्यपालन चे पर्याय अंगिकारत आहे.
या मत्स्यशेतीमध्ये आलेल्या तरुणांना मत्स्यपालन व्यवसायासाठी आवश्यक भांडवल पुरवठा, तंत्रज्ञान, शासकीय योजना, तज्ज्ञ मनुष्यबळ आणि प्रशासकीय परवानगी याबाबतचे मार्गदर्शन भाजपकडून केले जाणार आहे. त्याअनुषंगाने मत्स्यशेती करण्यास उत्सुक असलेल्या मस्त्य शेतकर्यांची आणि त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या जलसाठे यांची माहिती संकलित केली जात आहे. नवीन शेततळी बांधण्यासाठी शेतकर्यांना शासनाकडून अनुदान देऊन प्रोत्साहित केले जात आहे. तसेच मस्त्यशेती करीत असलेल्या व करण्यास इच्छुक असलेल्या मस्त्यशेतकर्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सिद्धांत शिवाजी उपसकर यांची नेमणूक सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी केली आहे. तरी इच्छुक मत्स्य शेतकरी भाजप मच्छिमार सेलचे संयोजक रविकिरण तोरसकर 9404900303/ 9225900303/ 9422633518) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री.काळसेकर यांनी केले आहे.