मनसेचा टोला; खासदार विनायक राऊतांवरही टीका…
कणकवली ता.०४: मुंबई-गोवा महामार्गाच्या कणकवली येथील निकृष्ट कामाबद्दल झोपलेले शिवसेनेचे तालुकाप्रमुख शैलेश भोगले जागे झाले,आणि त्यांनी याबाबतची तक्रार खासदार विनायक राऊत यांच्याकडे केली.त्यामुळे मनसेच्या माध्यमातून आम्ही त्यांचे आभार मानत आहोत,अशी खोचक टीका मनसेचे जिल्हा सचिव संतोष कुडाळकर यांनी केली आहे.याबाबत यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
त्यात असे म्हटले आहे की,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विशेषत: कणकवली शहरातील हायवेच्या निकृष्ट कामाबद्दल उशिरा का होईना शिवसेना तालुकाप्रमुख श्री.शैलेश भोगले यांना जाग आली आणि त्यांनी दिलीप बिल्डकॉन कंपनी व कामावर देखरेख करणारी आर.टी.फॅक्ट कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी खासदार विनायक राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याबद्दल श्री.भोगले यांचे मनसेतर्फे आम्ही जाहीर अभिनंदन करतो.
मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार श्री.परशुराम उपरकर यांनी गेली ३ वर्षे मुंबई-गोवा हायवेच्या निकृष्ट कामांतील भ्रष्टाचार वेळोवेळी जनतेसमोर आणल्या शिवाय आंदोलनही केले. मात्र आमचे मित्र शिवसेनेचे तालुकाप्रमुख अजूनही झोपले होते काय?, असा प्रश्न केला आहे. सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदार संघाचे संसदेतील खासदार विनायक राऊत यांनी पालकमंत्र्यांना, आमदारांना, पदाधिकाऱ्यांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरच कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेऊन हायवेच्या दर्जाहीन कामांची अनेक वेळा पाहणी केली.प्रत्येक वेळी ठेकेदाराला अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला दमबाजी केली.परंतु जनतेच्या जीवन-मरणाच्या या प्रश्नांवर एकदातरी लोकसभेत आवाज उठविला काय?, हायवे मधील कामांतील भ्रष्टाचारावर एकदा तरी कंपनीवर कारवाई केली काय?,खासदारांना हायवेच्या तांत्रिक कामांबाबत व प्रशासकीय कामांबाबत काहीच माहिती नसल्याने त्यांनी ३ वर्षांनी बाॅक्सेल ब्रिज कोसळल्यानंतर पाहणी दौरा केला. त्यावेळीही तालुकाप्रमुख शैलेश भोगले त्यांचे सोबत फोटोमध्ये चमकत होते.त्यानंतर खासदार व पालकमंत्र्यांनी हायवेचे काम दर्जेदार व उत्कृष्ट करून देण्याचे आश्वासन जनतेला दिले होते. परंतु ब्रिज पुन्हा ठिकाणी ठासून खासदारांची आश्वासने खोटी असल्याचे सिद्ध केले.
गेली ३ वर्षे अशा प्रकारे सत्ताधारी पक्षाचे खासदार, पालकमंत्री,आमदार व लोकप्रतिनिधी जनतेला फसवित आहेत. शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री.शैलेश भोगले यांनी दिलेल्या निवेदनामुळे अधोरेखित झाले आहे. कणकवलीतील महामार्गाच्या बॉक्सेल पुलाचे व रस्त्याचे कामात ठेकेदार कंपनीने व सल्लागार कंपनीचे लागेबांधे असून या कामात भ्रष्टाचार केल्याचे आरोप श्री.शैलेश भोगले यांनी केले असल्याने खासदार विनायक राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांनी सखोल चौकशी करून त्यांना काळ्या यादीत टाकावे व कामात भ्रष्टाचार झाल्याचे जाहीर करावे. तसेच शैलेश भोगले यांनी शिवसेनेच्या आमदार,खासदार,पालकमंत्री यांना हायवेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे व जनतेच्या जीवितास होणाऱ्या धोक्याची घंटा वाजवली. त्याबद्दल मनसेतर्फे श्री. शैलेश भोगले यांचे जाहीर अभिनंदन करीत आहोत. मात्र याच सातत्याने पाठपुरावा करून दोन्ही कंपन्यांना काळय यादीत टाकण्याची कारवाई करावी. म्हणजे पुढील काम दर्जेदार होण्यास मदत होईल असे संतोष कुडाळकर यांनी जाहीर केले आहे.
शैलेश भोगले हे आमचे जुने मनसेचे सहकारी आहेत. त्यांनी आपल्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना तांत्रिक प्रशासकीय भ्रष्टाचाराची जाणीव करून दिली. माणसे गेली ३ वर्षे ओरडून सांगते आहे. याबाबत शैलेश भोगले यांचे मनसेच्या वतीने आभार. शैलेश भोगले यांनी आपल्या लोकप्रतिनिधींना जाणीव करून द्यावी. मनसे सहकार्य करील.