शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; पालिकेच्या कामकाजाबाबत उपस्थित केले प्रश्नचिन्ह…
सिंधुदुर्गनगरी,ता.०४: चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर होणारा धोका लक्षात घेता सावंतवाडी भाजी मार्केटमधील एकाच ठिकाणी बसविण्यात आलेल्या त्या व्यावसायिकांना पूर्वीच्या जागेत बसविण्यात यावे,तसे आदेश पालिका प्रशासनाला देण्यात यावेत, अशी मागणी सावंतवाडी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. दरम्यान नुकताच शहरातील एक व्यक्ती ठाणे येथे फिरून आल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता, तो पालिका कार्यालयात फिरून गेला होता.त्यामुळे पालिकेच्या कामकाजाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.अशीही टीका यावेळी करण्यात आली.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, ज्येष्ठ नेत्या अनारोजीन लोबो यांनी संबंधित अन्याय झालेल्या भाजीविक्रेत्यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी शहराध्यक्ष तथा नगरसेवक बाबू कुडतरकर, भारती मोरे, शुभांगी सुकी, दिपाली सावंत, माधुरी वाडकर,सुरेंद्र बांदेकर आदी उपस्थित होते. यावेळी भाजीविक्रेत्यांची मागणी आणि कोरोनाची भिती लक्षात घेता सकारात्मक भूमिका आपण घेऊ, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे तालुकाप्रमुख राऊळ यांनी सांगितले.