भाजप नगरसेवकांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी ; १५ ऑगस्टपूर्वी निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा…
मालवण, ता. ४ : शहरातील अपंगांना आर्थिक मदत मिळण्याच्या दृष्टीकोनोतून पालिकेने अपंग निधी वितरित करावा, अशी मागणी उपनगराध्यक्ष राजन वराडकर व भाजप नगरसेवक गणेश कुशे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
यावर्षीच्या पालिका फंडातील अपंगांसाठी राखीव असलेला पाच टक्के निधी अद्यापपर्यंत वितरीत केलेला नाही. दरवर्षी गणेश चतुर्थीपुर्वी या निधीचे वाटप केले जाते. सध्या कोविडची साथ असल्यामुळे सर्वांचेच कामधंदे बंद आहेत. त्याचप्रमाणे अपंग बांधवांचे देखील कामधंदे बंद असल्यामुळे त्यांनाही स्वत:चे घर चालविण्यासाठी तसेच व्यवसाय सुस्थितीत आणण्यासाठी आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. त्यामुळे लवकरात लवकर यासंबंधीचे नियोजन करुन पाच टक्के निधी अपंग बांधवांपर्यंत तातडीने पोचवावा. १५ ऑगस्टपर्यंत यासंबंधी ठोस निर्णय होऊन अपंग बांधवांच्या खात्यात पैसे जमा न केल्यास अपंग बांधवांना सोबत घेऊन आंदोलन करावे लागेल, असा इशाराही श्री. वराडकर व कुशे यांनी दिला आहे.