ग्राहक पंचायत महाराष्ट्रची मागणी…
वैभववाडी,ता.०५: संपूर्ण राज्यात भेसळयुक्त दूध मोठ्या प्रमाणात विकले जात असताना अन्न व औषध प्रशासन या गंभीर विषयाकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनात आले आहे. त्यामुळे दुधात भेसळ करणाऱ्यांसह कर्तव्यात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे कोकण विभाग प्रभारी अध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील, जिल्हा संघटक एकनाथ गावडे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे, प्रधान सचिव डॉ.प्रदीपकुमार व्यास (सार्वजनिक आरोग्य),अन्न व औषध प्रशासन विभाग आयुक्त व सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
दूध आपल्या सर्वांच्या जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे. परंतु आज बाजारामध्ये शुध्द दूध मिळणे अवघड आहे. शुद्ध दुधाच्या नावाखाली भेसळयुक्त दूध विकले जात असल्याच्या तक्रारी आहेत. दुधातील भेसळीचे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता, असे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. दूध हा सहजपणे भेसळ करता येण्यासारखा पदार्थ आहे. आता सीलबंद पिशवीतील दूधही सुरक्षित राहिले नसून त्यामुळे ते आरोग्यालाच नव्हे, तर जीवालाही अपायकारक ठरण्याची शक्यता असते.
दूध अधिक काळ ताजे राहावे, यासाठी त्यात सोडियम बायकार्बोनेट किंवा सोडियम हायड्रोक्साईड मिसळले जाते. त्यामुळे दूध आरोग्याला अपायकारक ठरण्याची शक्यता निर्माण होते. असेही या निवेदनात नमूद केले आहे. या भेसळयुक्त दुधाची मोठ्या प्रमाणात सर्रास विक्री होत असताना, यात भेसळखोरांचे आणि प्रशासकीय अधिकारी यांचे साटेलोटे असल्याची शंका व्यक्त होत आहे. अशा दूध भेसळखोर व विक्रेत्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य कारवाई करावी अशी मागणी केली आहे.