राजन दाभोलकर यांची टीका…
कणकवली, ता.५ : कणकवली शहरातील प्लायओव्हर, सर्व्हिस रस्ते आणि गटारांची दुर्दशा झाली आहे. त्याला सत्ताधारी शिवसेना आघाडी आणि विरोधी पक्षांतील भाजपची नेतेमंडळी जबाबदार असल्याची टीका मनेसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी आज केली.
दाभोलकर म्हणाले, कणकवली हायवेचे काम सुरु झाल्यापासून येथे 60 मीटर रस्ता हवा की 45 मिटर रस्ता हवा या मागणीपासून नंतर बॉक्सवेल ब्रीज हवा की प्लाय ओव्हर ब्रीज हवाय या मागणीपर्यंत अनेक पुढारी व नेत्यांनी आपआपल्यापरीने सोईस्कर आवाज उठविला. मग त्यानंतर लढाई सुरु झाली ती जमिनीची, इमारतींची, झाडांची, स्टॉलची व शेडची नुकसान भरपाई जास्तीत जास्त कशी पदरात पाडून घेता येईल त्याचे प्रयत्न झाले आणि रस्त्याच्या कामांवर दुर्लक्ष झाले. पहिल्या पावसातच कणकवलीत चिखलाचे साम्राज्य झाले. गेली 3 वर्षे 3 पावसाळे जनता मात्र भोग भोगित आहे. विविध पक्ष नेत्यांनी कणकवलीकर पुढाऱ्यांनी बैठका घेऊन जाब विचारला. पण कुणीही दाद देत नाही म्हटल्यावर आमदारांनी संबधित अधिकाऱ्यांवर चिखलफेक केली. मग अधिकारी बदलेले गेले. गेले वर्षभर चिखलफेक करणारे शांत बसले. पण त्यांचे विरोधकही मूग गिळून गप्पच होते. फक्त अधुनमधुन कणकवलीकर नावाचे अभ्यासू पुढारी सरकार दरबारी भेट देऊन ग्राऱ्हाणे मांडत होते. पण ह्याचे म्हणणे ऐकून घेणाऱ्यांना कोणतेही अधिकार नाहीत हे कणकवलीकरांना उशिरा कळले. पण त्यांचाही ईलाज चालला नाही. शेवटी व्हायचे तेच झाले पुलाखालून आणि पुलावरुन दोन्ही बाजुंनी पाण्याचे धबधबे निर्माण होऊन कोकणातल्या धुवाँधार पावसाने आपला पराक्रम दाखवला. चक्क ब्रीजच्या कठड्यांना व भराव टाकलेल्या रस्त्यांना तडे गेले. गटारे चिखलाने भरली. रस्त्यावरही चिखलच झाला. हायवेच्या कामांची निसर्गाने पोलखोल केली.
सिंधुदुर्गात कणकवली कसाल ओरोस कुडाळ वगैरे ज्या ज्या ठिकाणी मातीचे मोठे भराव घालून ब्रीज बांधण्यात आले आहेत त्या त्या ठिकणी मातीवर दगड टाकून पिचिंग करण्यात आलेले नाही. तसेच भरावाच्या दोन्ही बाजुंनी काळीथर दगडांनी उतरचे पिचींग होणे आवश्यक होते ते सुद्धा करण्यात आलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यातून ठिकठिकाणी पाणी व माती खाली जाऊन भराव दुभंगले गेले असून काँक्रिटच्या भींती फोडून माती व पाणी बाहेर आले. भराव कोसळले. त्यामुळे वाहतुकीला व जीवीताला प्रचंड धोका निर्माण झालेला आहे. या सर्वांचे स्ट्रक्चरल ऑडिट सेंट्रल गव्हमेंटच्या स्ट्रक्चरल ऑडीट विभागामार्फत व्हायला हवे. ज्याप्रमाणे महाड पूल दुर्घटनेनंतर कोकणातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले त्याप्रमाणे मुंबई गोवा हायवेच्या नव्याने बांधलेल्या छोट्या/ मोठ्या पुलांचे व रस्त्याचेही स्ट्रक्चरल ऑडीट झाले पाहिजे. अशी आमची मागणी असल्याचे श्री.दाभोलकर यांनी सांगितले.
पुढाऱ्यांच्या व जनतेच्या मागणीनुसार शासनाने जानवली-कणकवली व वागदे येथील हायवे 60 मीटर ऐवजी 45 मीटर रुंदीचा केला. त्याप्रमाणे (रो लाईन) रेड फुलीचे शिक्के मारुन हद्द निश्चित करणेत आली. मात्र सर्व्हीस रोड व दोन्ही बाजुंनी गटारांवर फुटपाथ बांधुन झाल्यानंतर उर्वरीत जागेचे मालक आपणच असल्यासारखे अनेकांनी त्यावर अतिक्रमण केले आहे.
हायवे प्राधिकरणाने मारलेल्या दोन्ही बाजुंनी 22.5/ 22.5 मीटर हद्दीच्या खुणा केव्हाच फुसल्या गेल्या. काही इमारत मालकांनी बाधीत जागेचे पुर्ण नुकसान भरपाई मिळून सुद्धा त्यांनी अर्धवट पाडलेली बांधकामे दुरुस्ती करुन तेथे आपले व्यवसाय सुरु केले आहेत. इमारती पाडताना त्यांचे पिलर हलले आहेत.अशी एखादी इमारत ऐन पावसात कोसळल्यास मनुष्यहानी होण्याची दाट शक्यता आहे.याकडे सर्वांनी डोळेझाक केली आहे. मात्र आम्ही कणकवलीकर मंडळी ही बांधकामे काढून टाकण्याची मागणी का करीत नाहीत?
आता तर हायवेच्या दुतर्फा व पुलाखाली फेरीवाले, किरकोळ विक्रेते, भाजीवाले, गाडीवाले या सगळ्यांनी हायवेच्या फुटापाथपर्यंत आतापर्यंत आतापासूनच अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांसह केलेल्या हायवे पाहणीच्यावेळी त्यांच्याच पक्षाच्या पुढाऱ्यांनी पुन्हा मोजणीची मागणी केली आहे व दोन्ही बाजुंनी 22.5 मीटरप्रमाणे अंतर निश्चित करुन बांधकामे हटविल्याची मागणी केली आहे. परंतु त्याबाबतही कारवाई झालेली नाही.
खासदार, आमदार व सत्ताधारी पक्षाचे नेते अनेक वेळा रस्त्याच्या दुर्दशेची व बॉक्सेल ब्रीजच्या पाहणीचे वेळी संबधित ठेकेदाराच्या अधिकाऱ्यांना “फुसका दम” भरतात. परंतु कोकणातील खासदार व आमदारांनी हायवेच्या निकृष्ट बांधकामाबाबत आणि कोसळलेल्या ब्रीजबाबत लोकसभेत व विधानसभेत एकदाही आवाल उठविलेला नाही. “तू मारल्यासारखे कर… मी रडल्यासारखे करतो” असे प्रकार चालले आहेत. हायवेचे अधिकारी व ठेकेदार कुणालाच जुमानत नाही हे सिद्ध झालेले आहे. जनतेला सोसाव्या लागणाऱ्या त्रासाची कुणालाही चाड राहिलेली नाही.
केवळ प्रसार माध्यमांना मुलाखती देऊन हायवेच्या कामात सुधारणा होणार नाही. म्हणूनच एम.एम.हायस्कूल जवळ कोसळलेल्या बॉक्सेल ब्रीज, तसेच प्रहार कार्यालयासमोरील बॉक्सेल ब्रीज, शिवाजी चौक व इतर ठिकाणी कोसळेलेले ब्रीज व खचलेले रस्ते हे पुर्णत: काढून टाकून तेथे Y पिलर टाकून प्लाय ओव्हर ब्रीज जानवली ते गडनदीपर्यंत करावा अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी केली आहे.