नंदन वेंगुर्लेकर; खासदार विनायक राऊत यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी…
वेंगुर्ले,ता.०५: गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात येणार्या चाकरमान्यांची संख्या लक्षात घेता या ठिकाणी कोरोनाची भिती नाकारण्यात येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात, रुग्णालयात रिक्त असलेली डॉक्टर,नर्स आणि फार्मासिस्टची पदे येत्या आठ दिवसात भरा. तसेच त्यासाठी निधीची कमतरता असेल तर खनिकर्मचा वीस कोटीचा निधी वापरा,अशी मागणी आधार फाउंडेनचे सचिव नंदन वेंगुर्लेकर यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे केली आहे.
याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे.यात त्यांनी असे म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातली आरोग्य यंत्रणा आजारी आहे. जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात वैदयकीय अधिकारी नाहीत. तसेच नर्स आणि फार्मासिस्टची पदे रिक्त आहेत.त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे पुढे होणारा धोका लक्षात घेता,ही पदे तात्काळ भरण्यात यावीत. डॉक्टरची पदे भरताना होमिओपॅथिक व आयुर्वेदीक डॉक्टरांचा विचार करण्यात यावा, तसेच नर्स आणि फार्मासिस्टची पदे भरताना जिल्ह्यातील महाविद्यालयात शिक्षण घेणार्या मुलांचा विचार करण्यात यावा, अशी त्यांनी मागणी केली आहे.