नदी-नाल्यांना पूर; शिरोडा बाजारपेठेत घुसले पाणी…
वेंगुर्ले ता.०५: तालुक्यात गेले दोन दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत असून नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत.आज सकाळी अनेक रस्त्यांवर पाणी आले होते.शिरोडा बाजारपेठेत पावसाचे पाणी वाढल्याने काही दुकानांमध्ये हे पाणी घुसल्याने नुकसान झाले.आज पावसाने थोडी उसंती घेतली मात्र सकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने रौद्ररूप धारण केले होते.
अनेक मार्गांवर झाडे उन्मळून पडल्याने त्या त्या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. दरम्यान शिरोडा येथील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. पाणी घुसल्याने दुकानचे मालक बादलीने पाणी उसपुण काढत होते. दुकाने साफ करत होते. तर काही दुकानांमध्ये पाणी जास्त गेल्याने पंपाद्वारे पाणी दुकानातून बाहेर काढण्यात येत होते पाऊस मोठा पडत असला तरी पाणी वाहून जाणारे गटार अरुंद असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. मातीने तुंबलेली गटारे साफ करणे व गटांची रुंदी वाढविल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. गटारांची रुंदी वाढवण्याची मागणी व्यापारी करीत आहेत. जोराचा वारा पाऊस असल्याने मोठ्या प्रमाणात विजेचा खेळखंडोबा होत आहे. तर काही ठिकाणी विजेचे खांब पडल्याने दोन दिवस शिरोडा परिसरात लाईट गायब झाली आहे. सतत कोसळत असलेल्या पावसाने तालुक्यातील काही घरांचीही पडझड झालेली आहे. तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. दोन दिवस भ्रमणध्वनी, दूरध्वनी व इंटरनेट सेवा बंद होती त्यामुळे बँक व इतर व्यवहार होऊ शकले नाहीत.