समीर नलावडे; गणेशोत्सवात विक्रेते,पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन…
कणकवली, ता.०५: कणकवली शहरातील मानाचा गणपती यंदा ११ ऐवजी ७ दिवस असणार आहे.तर लालबाग मित्रमंडळातील सर्व घरगुती गणपती पाच दिवस असणार आहेत.शहरातील पटवर्धन चौक ते बसस्थानक परिसरात विक्रेते,वाहन पार्किंग व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. तर ७ ऑगस्ट पासून कणकवली बाजारपेठ बंद राहणार ही निव्वळ अफवा असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज दिली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत पदाधिकारी, प्रशासन यांची बैठक झाली. यात घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज दिली. त्यांच्यासोबत नगरसेवक अभिजित मुसळे, बंडू हर्णे, अॅड.विराज भोसले, नगरसेविका मेघा गांगण, माजी नगरसेवक बंडू गांगण, महेश सावंत आदी उपस्थित होते.
श्री.नलावडे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सव नियोजनात विविध बदल करण्यात आले आहेत. तर शहरातील विविध नागरिक आणि मंडळांनीही यंदाचा गणेशोत्सव कमी दिवस साजरा करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार शहरातील टेंबवाडी येथील मानाचा गणपती 11 ऐवजी सात दिवस असणार आहे. तर लालबाग मित्रमंडळातील घरगुती गणपती पाच दिवस असणार आहेत. याखेरीज शहरातील गणेशमूर्तींवर नगरपंचायतीतर्फे पुष्पवृष्टी कार्यक्रम होणार नाही. मात्र सर्वच गणपती साण्यांवर विद्युत रोषणाई व इतर व्यवस्था सज्ज ठेवली जाणार आहे.
दरम्यान कणकवली बाजारपेठ 7 ऑगस्टपासून बंद राहणार असल्याची अफवा पसरविण्यात आली आहे. त्यात कोणतेही तथ्य नाही. शहर बाजारपेठेत दोन ठिकाणी कंटेन्मेंट झोन आहेत. त्याची मुदत येत्या 4 दिवसांत संपेल त्यानंतर झेंडा चौक ते ढालकाठी या परिसरातील अडथळे काढून टाकले जाणार आहेत. तसेच गणेशोत्सव कालावधीत शहर बाजारपेठ सुरळीत सुरू राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष श्री.नलावडे यांनी दिली.
नलावडे म्हणाले, गणेशोत्सवात बाजारात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पटवर्धन चौक ते पटकीदेवी मंदिर या मार्गावर नो हॉकर्स झोन असणार आहे. तर हातगाडीवरून व्यवसाय करणार्या विक्रेत्यांना तेलीआळी डीपी रोडवर व्यवसाय करता येणार आहे. गणेशोत्सव कालावधीत मराठा मंडळ रोड आणि नरडवे रोड या दोन रस्त्यांवर आराम बसेससाठी पार्किंग व्यवस्था असेल. तर एस.टी.बसस्थानकासमोरील पुलाखाली, हॉटेल हॉर्नबिल लगत आणि तेलीआळी डीपी रोडवर एका बाजूने फोर व्हिलरसाठी पार्किंग व्यवस्था असणार आहे.
शहरातील पटवर्धन चौक ते अभ्युदय बँक या सर्व्हिस रोडच्या बाजूने गावठी भाजी विक्रेत्यांसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. तर मंगळवारचा आठवडा बाजार रद्द करण्यात आला आहे. पटवर्धन चौकात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आचरा मार्गावरून येणारी अवजड वाहतूक किनई रोड वरून वळविण्यात येणार आहे. या सर्व निर्णयांची अंमलबजावणी 17 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचीही माहिती श्री.नलावडे यांनी दिली..