दीड लाखाचे नुकसान;गोठ्यातील सात जनावरे बचावली,तर एक जखमी…
बांदा,ता.०५:मडुरा पंचक्रोशीत गेले चार दिवस सुरू असलेले मुसळधार पावसाचा जोर वाढल्याने पाडलोस-केणीवाडा येथील सुर्यकांत नाईक व प्रशांत नाईक यांचा मांगर जमिनदोस्त झाला. गेल्या मे महिन्यातच संपूर्ण मांगराचे दीड लाख रुपये नुकसान झाले. तसेच मांगराला लागूनच असलेल्या गोठ्यातील सात जनावरे सुदैवाने वाचली तर एक जखमी झाले.
बुधवारी पहाटेच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे पंचक्रोशीतील नागरिकांची भितीने गाळणच उडाली. मे महिन्यातच नाईक कुटुंबियांनी संपूर्ण मांगराच्या छप्पराचे नवीन काम केले होते. मांगराला लागूनच असलेल्या गोठ्यातील आठ जनावरे आतमध्ये अडकली होती. मात्र ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत जनावरांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले. शर्थीचे प्रयत्न करूनही एका जनावराला दुखापत झाल्याचे सुर्यकांत नाईक यांनी सांगितले.
मांगरामध्ये जळाऊ लाकुड, शेणी, गवत, शेतीची अवजारे तर छप्परात वासे, बांबू, पाशिट, रिप, कौलारू नळे, सूम, सरी, पत्रे तसेच अन्य साहित्य मजुरी असे मिळून सुमारे दीड लाखांचे नुकसान झाल्याचे नाईक कुटुंबियांनी सांगितले.
जनावरांना वाचविण्यासाठी पाडलोस तंटामुक्त समिती अध्यक्ष महेश कुबल, ग्रामस्थ सप्रेम परब, महादेव नाईक, सिद्धेश कोरगावकर, वामन केणी, राजन नाईक, समीर नाईक, श्रीधर परब, गणपत नाईक, परशुराम नाईक, महेश नाईक, लवु कुबल, मदन कुबल, भुषण केणी, प्रशांत नाईक, सुर्यकांत नाईक, गोकुळदास परब, एकनाथ नाईक, गंगाराम नाईक आदी ग्रामस्थांनी धाव घेतली. मडुरा माऊली मंदिर पूल पाण्याखाली
मडुरा माऊली मंदिर पूल पाण्याखाली गेल्याने पाच ते सहा तास वाहतूक खोळंबली होती. वारंवार मागणी करूनही याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्यामुळे आम्हाला अशा नैसर्गिक परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तर सदर पुलाची उंची वाढविण्याची मागणी वाहनचालकांमधून होत आहे.
दांडेलीत वाहतूक खोळंबली
कोंडुरा-दांडेली-सावंतवाडी मुख्य मार्गावरील दांडेली येथील पुल पाण्याखाली गेले. नदी काठच्या बागायतीत पाणी घुसल्याने पुरसदृष्यस्थिती निर्माण झाली होती. परंतु पावसाचा जोर कमी होत गेल्याने पाण्याची पातळीही कमी कमी होत गेली. पाडलोस सरपंच अक्षरा पाडलोसकर, पोलीस पाटील रश्मी माधव, मडुरा कोतवाल विष्णु वेंगुर्लेकर यांनी नुकसानग्रस्त मांगराची पाहणी केली.