वैभववाडी,ता.०५: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक संकटे असताना प्रत्येक कलावंत आपापल्या परीने कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या कलावंतांनीही मोठे योगदान दिले आहे. सिने नाट्य दिग्दर्शक रमेश वारंग यांनी कोरोना हरणार.. जग जिंकणार, लावू एक दिवा… कोरनामुक्त भारत हवा, या पथनाट्यातून जिल्ह्यात प्रामाणिकपणे समाज प्रबोधनाचे काम केले आहे. त्यांचे समाज प्रबोधनाचे पुढचं पाऊल म्हणजे मालवणी भैय्या. या कार्यक्रमातून अभिनेते रमेश वारंग हे अनेक विषयावर प्रकाशझोत टाकत प्रबोधनाचे काम करत आहेत.
एक चावट मधुचंद्र, अभी तो हम जवान है, सनी तुच माझ्या मनी या नाटकातून रसिकांची मने जिंकत मनोरंजन करणारा चावट भैय्या रमेश वारंग आता कोकणात तळ ठोकून मालवणी भैय्या बनला आहे.
सिने नाट्य दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध असलेले रमेश वारंग हे वैभववाडी तालुक्यातील करुळ गावचे सुपुत्र आहेत. अत्यंत गरीबीत व हालाखीत गावात रमेश वारंग यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. लहान वयात मस्ती, खोड्या करणे यात माहीर असलेल्या वारंग यांनी सिने नाट्य क्षेत्रात मुंबईसारख्या शहरात घेतलेली भरारी अतुलनीय आहे. कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना केवळ मेहनत आणि परिश्रमाच्या जोरावर रमेश वारंग यांनी या क्षेत्रात यश मिळवले आहे.
अभिनेते रमेश वारंग हे कोरोनाच्या संकटामुळे गेली तीन महिने गावी आहेत. लाँकडाऊनच्या काळात रसिकांचे मनोरंजन व्हावे, मनोरंजनातून त्यांचे प्रबोधन व्हावे, या हेतूने वारंग ग्रामीण भागात काम करत आहेत. मालवणी भैय्या या यूट्यूब च्या माध्यमातून अभिनेता रमेश वारंग मालवणी भैय्या च्या भूमिकेत दिसत आहे. समाज प्रबोधनाबरोबर कोकण रेल्वेतील धमाल किस्से, निसर्गरम्य पर्यटन स्थळे, कोकणातील अधूनिक शेती, शेती विषयक माहिती, आयुर्वेदिक वनस्पतींचे फायदे याबाबतची माहिती मालवणी भैय्या आपल्या खास शैलीत मांडणार आहे. कोकणातील शेतकऱ्यांचा कल सध्या काजू, बांबू लागवडीकडे वाढत आहे. वडलोपार्जित जमिनीत शेती करा, वृक्ष लागवड करा आणि कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचवा हाच संदेश यातून वारंग देत आहेत. निसर्गप्रेमी रश्मी मोरे यांच्यासह अनेक क्षेत्रातील तज्ञ मंडळींची वारंग यांनी भेट घेऊन माहिती संकलित केली आहे. ग्रामीण भागातील युवक नोकरीसाठी पुणे, मुंबईसारख्या शहरात धावत आहेत. या शहरांची अवस्था सद्यस्थितीत बिकट झाली आहे. त्यामुळे युवकांनी शेतीतून प्रगती साधली पाहिजे.
प्रगतशील शेतकरी युवक घडला पाहिजे. यासाठी वारंग कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. गेली चार वर्षात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून रमेश वारंग यांनी ग्रामीण भागातील स्थानिक कलाकारांना कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळवून देण्याचे काम केले आहे. एक चावट मधुचंद्र, अभी तो हम जवान है, सनी तूच माझ्या मनी, छोट्यांची लोकधारा, जंगल बुक, ही स्वामींची इच्छा यासारख्या विविध नाटकांची निर्मिती दिग्दर्शन व लेखन त्यांनी केले आहे. मालवणी भैय्या कार्यक्रमासाठी हीतल नितीन शिंदे, साहिल प्रकाश होळकर, कृतिका सोहनी, अर्जिता चव्हाण, अक्षता चव्हाण, सनी भूषण मुणगेकर, अभय राणे, अमित माळकर, संतोष सावंत, विकास कोलते, विलास वारंग, सचिन माणगावकर, हेमंत पाटील, शेखर दाते, दीपक जाधव, सारथी शिंदे, रश्मी मोरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
फोटो – रमेश वारंग.