शिवप्रेमींचा पुढाकारः स्थानिक लोकप्रतिनिधींना अनेक ठिकाणी दिली निवेदने…
वेंगुर्ले,ता.०६: सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरात लवकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय होण्यासाठीची कारवाई जलद गतीने करण्यात यावी,यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक संघटनानी एकत्र येवून जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देत निवेदन देण्यात आली होती.त्याच वेळी जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला आता जिल्ह्यातून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कुडाळ शहरातून नगराध्यक्ष यांना,शिरोडा,रेडी,आरोंदा,तेंडोली गावात सरपंच यांना निवेदन देण्यात आली आहेत.
यावेळी नागरिकांची मागणी सर्व स्थानिक लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन सरकारपर्यंत पोचवावी व पाठपुरावा करावा,अशी मागणी करण्यात आली. यासाठी शिवप्रेमी सिंधुदुर्ग,शिवप्रेमी यशवंतगड,तेंडोली शिवप्रेमी यांनी पुढाकार घेतला असून ग्रामस्थांच्या सह्या घेऊन ही निवेदन देण्यात आली आहेत.लवकरात लवकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्हावे ही मागणी आता जोर धरताना दिसत आहे.



