Tuesday, March 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याग्रामपंचायतीकडून मोबदला न मिळाल्याने पाडलोस ग्रामस्थ आक्रमक...

ग्रामपंचायतीकडून मोबदला न मिळाल्याने पाडलोस ग्रामस्थ आक्रमक…

ग्रामसेवकांना विचारला जाब; रस्त्यावर आलेल्या झुडपांची केली होती सफाई…

बांदा,ता.०६: पाडलोस-केणीवाडा येथील राम मंदिर अंतर्गत रस्त्यावर आलेली झुडपे ग्रामस्थांनी तोडून साफसफाई केली होती. याचा मोबदला म्हणून ग्रामपंचायतकडून त्यांना रक्कम प्राप्त न झाल्याने ग्रामस्थांनी ग्रामसेवक चंद्रकांत शेडगे यांना जाब विचारला. एकवर्ष होऊनही सदर प्रकरणाचे मस्टर भरले नसताना सुद्धा दोन हजार ५०० रुपयांचा रुपयांचा धनादेश कसा काढला? त्या कामाचे मुल्यांकन पाठीमागून का करण्यात आले? याला सर्वस्वी जबाबदार ग्रामसेवक व ग्रामपंचायत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच याची सखोल चौकशी करून पाडलोस ग्रामपंचायतचा आर्थिक व्यवहार पारदर्शक करण्याची मागणीही ग्रामस्थांनी यावेळी केली.
ग्रामपंचायतचा निधी वाया न जाण्यासाठी ग्रामस्थच पारदर्शक बनले. यावेळी सरपंच अक्षरा पाडलोसकर, उपसरपंच महादेव गावडे, ग्रा.पं.सदस्य गणपत पराडकर, शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष महेश कुबल, ग्रामस्थ समीर नाईक, रंजन नाईक, महादेव नाईक, सचिन कोरगावकर, महेश नाईक, गोकुळदास परब उपस्थित होते.
२०१८-१९ मध्ये केणीवाडा अंतर्गत रस्त्यावरील झुडपांची सफाई ग्रामस्थांनी केली होती. याचा मोबदला म्हणून त्या दरम्यान झालेल्या मासिक सभेत ग्रामसेवक चंद्रकांत शेडगे यांनी आपल्याकडे एक हजार रुपये रोख रुपात दिल्याचे ग्रा.पं.सदस्य गणपत पराडकर यांनी सांगितले. मात्र ग्रामसेवक म्हणाले की, शिपाई लवु गावडे यांच्याकडे आपण अडिच हजार रुपयांचा धनादेश दिला होता. परंतु दोन वर्षे होऊनही ग्रामस्थांना उर्वरीत रक्कम का मिळाली नाही असा सवाल महेश नाईक यांनी केला. त्यामुळे ग्रामसेवक व शिपाई यांचे काहीतरी समीकरण असल्याचा आरोप समीर नाईक यांनी केला.
गणपत पराडकर यांनी आक्रमक भूमिका घेत ग्रामसेवकांनी स्वतः आपल्याकडे एक हजार रुपये मासिक सभेत रोख दिल्याचे सांगितले तर ग्रामसेवक म्हणाले आपण रोख रक्कम दिली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निधीचा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप महेश कुबल यांनी केला. ग्रामसेवक व शिपाई या दोघांनीही सदर रक्कम भरणा करावी, असे राजू शेटकर यांनी सांगितले. तसेच जर आर्थिक व्यवहाराची जबाबदारी शिपायांवर सोपवली जाते तर ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून शिपायांनाच बसवा असेही ते म्हणाले.
दरम्यान, सरपंच अक्षरा पाडलोसकर यांनी मध्यस्थी करत येत्या चार दिवसांत गटविकास अधिकाऱ्यांना पाडलोसमध्ये बोलावून सदर प्रकरणाची चौकशी ग्रामस्थांच्या समोरच करू असे आश्वासन दिले. तसेच अधिकाऱ्यांच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे ग्रामस्थांना अशा समस्यांना सामोरे जावे लागत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments