Sunday, March 16, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावेंगुर्लेत माटवीचाच बाजार फक्त रस्त्यावर भरणार...

वेंगुर्लेत माटवीचाच बाजार फक्त रस्त्यावर भरणार…

गणेशोत्सव नियोजन : इतर विक्रेत्यांना रस्त्यावर बसण्यास परवानगी नाही…

वेंगुर्ला ता.०६ :गणेश चतुर्थी सणाच्या निमित्ताने दरवर्षी रस्त्यावर बाजार भरविला जातो. परंतु यावर्षी कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कोणत्याही व्यापा-याला रस्त्यावर विक्री करता येणार नाही. मात्र, दि.२० व २१ ऑगस्ट रोजी गाडीअड्डा ते सारस्वत बँकपर्यंत रस्त्याच्या एका बाजूने फक्त माटवीच्या सामानाची विक्री करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. गणेशोत्सव कालावधीत ज्यांना दुकाने लावायची आहेत त्या किरकोळ व्यापा-यांनी १० ऑगस्टपूर्वी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडे आपली नोंदणी करणे बंधनकारक आहे, असे महत्त्वपूर्ण निर्णय गणेशोत्सव नियोजन बैठकीत घेण्यात आले.
गणेशोत्सव नियोजनाची वेंगुर्ला शहराची सभा नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली आणि तहसिलदार, पोलिस निरीक्षक, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, विज वितरणचे प्रतिनिधी, किरकोळ व्यापारी, रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी, नगरसेवक व नगरपरिषद कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
गणेशोत्सवासाठी वेंगुर्ला बाजारपेठेत लावण्यात येणारी दुकाने ही १८ ऑगस्टपासून किमान तीन फुटाच्या अंतरावर लावण्यात येतील. तसेच भाजी, फळ, फुल, अगरबत्ती वगैरेंची दुकाने रस्त्यावर न लावता नगरपरिषदेच्या नविन इमारतीचे काम चालू आहे त्याठिकाणी दुकाने लावावयाची आहेत. भाजी विक्रेत्यांनी नगरपरिषद भाजी मार्केटमध्ये नियोजित केलेल्या जागेतच आपला व्यवसाय करावयाचा आहे. त्यासाठी भाजी विक्रेत्यांनी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडे १० ऑगस्टपूर्वी नोंदणी करावी. विहित मुदतीत नावे न येणा-या व्यापा-यांना नगरपरिषदेकडे उपलब्ध असलेली जागा संपल्यानंतर जागा दिली जाणार नाही. तसेच शहरात इतरत्र कुठेही व्यापार करायची मुभा राहणार नाही. संपूर्ण गणेशोत्सव कालावधीत दि.२० ते २७ ऑगस्टपर्यंत मारुती स्टॉप ते दाभोली नाका हा रस्ता चारचाकी व जड वाहनांसाठी बंद राहणार आहे. दाभोली नाका ते सारस्वत बँक तसेच हॉस्टिपल नाका ते गाडीअड्डा नाका पर्यंत रिक्षा व्यावसायीकांनी दरवर्षी प्रमाणे आपली वाहने नियमाप्रमाणे लावून वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. मच्छि विक्रेत्यांनी गणेशोत्सव कालावधीत मानसी गार्डनसमोरील नियोजित केलेल्या ठिकाणी व्यवसाय करावा, असे या बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले.
गणेशोत्सव कालावधीमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्याकरीता केलेल्या नियोजनाची अंमलबजावणी करुन सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments