चौपदरीकरण मोबदला, हायवे काम दर्जा, वृक्ष लागवड कार्यवाहीची मागणी…
कणकवली, ता. ०६: कणकवली तालुका काँग्रेस (आय)चे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांचे आमरण उपोषण आज दुसर्या दिवशी देखील सुरूच आहे. त्यांच्या मागण्यांबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती तहसीलदार आर.जे.पवार यांनी दिली. मात्र ठोस आश्वासन मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार श्री.मांजरेकर यांनी व्यक्त केला. आज दुसर्या दिवशीही विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, राजकीय लोकप्रतिनिधी यांनी मांजरेकर यांची भेट घेऊन त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला.
श्री.मांजरेकर यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर 5 ऑगस्ट पासून उपोषण सुरू केले आहे. महामार्ग चौपदरीकरणातील अनेक प्रकल्पबाधितांना मोबदला लवादाकडे प्रलंबित आहे. त्या सर्व दाव्यांचा निकाल तातडीने देण्यात यावा. ज्या प्रकल्पबाधितांना लवादाकडून भरपाई मंजूर झाली, त्यांची कार्यवाही तातडीने व्हावी. तर ज्या केसेस जिल्हा कोर्टामध्ये वर्ग आहेत, त्यांच्यासाठी स्वतंत्र कोर्ट नेमावे. हायवेच्या कामाच्या दर्जाची पाहणी होऊन दुरुस्तीची कार्यवाही व्हावी आदी मागण्या श्री.मांजरेकर यांनी केल्या आहेत.
मांजरेकर यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने तहसीलदार श्री.पवार यांनी महसूल विभागाकडून सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती त्यांना दिली आणि उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र हायवे मोबदल्याबाबत ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे श्री.मांजरेकर म्हणाले. त्यांच्या उपोषणाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांच्यासह आर.टी.मर्गज, इर्शाद शेख, दया मेस्त्री आदींनी भेटून पाठिंबा दिला.