कमी कालावधीत दर्जा मिळवणारी कोकणातील पहिली शैक्षणिक संस्था…
सावंतवाडी,ता.०७: दर्जेदार शिक्षण देणा-या येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या सिव्हील,मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या तीनही विभागांना पुढील ३ वर्षांकरिता नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडीटीशन (एन.बी.ए.) मानांकन प्राप्त झाले आहे.सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड या तीन जिल्ह्यांमधून अशा प्रकारचे मानांकन प्राप्त करणारी ही पहिलीच संस्था आहे. स्थापनेपासून अत्यंत कमी कालावधीत म्हणजेच केवळ ५ वर्षांच्या कालावधीत हे महत्वपूर्ण यश मिळवल्याने कॉलेजचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
अभियांत्रिकी क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर एन.बी.ए. मानांकनाला फार महत्व आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचे मूल्यमापन करणे व गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धती सुनिश्चित करण्याचे काम एनबीए समितीमार्फत करण्यात येते.अभियांत्रिकी संस्थांमधील विविध अभ्यासक्रम हे आऊटकम बेस्ड एज्युकेशन म्हणजेच परिणामकारक शिक्षणपद्धतीचा अवलंब करून राबविले जावेत, यावर एनबीएचा भर असतो. शिक्षणाचा उच्च दर्जा निश्चित करणारे हे मानांकन यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या सिव्हील, मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल या ३ पदविका अभ्यासक्रमांना देण्यात आले आहे. त्यामुळे या कॉलेजमधून संपादन केलेल्या पदविकेला जागतिक पातळीवर मान्यता मिळालेली आहे. या मानांकनामुळे सिंधुदुर्गामध्येही आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण दिले जाते, यावर शिक्कामोर्तब झाले. अत्याधुनिक शिक्षणपद्धती, उत्कृष्ट पायाभूत सुविधा व शिस्त या बळावर कॉलेजने ही मजल मारली आहे.
शाखानिहाय शैक्षणिक दर्जाचे मूल्यांकन, अत्यंत खडतर आणि महाग प्रक्रिया आहे. त्यात केवळ पात्र की अपात्र, एवढेच स्पष्ट केले जाते. त्यामुळे अनेक कॉलेज या मूल्यांकनाला सामोरे जात नाहीत. सप्टेंबर २०१९ मध्ये एन.बी.ए. टीमने कॉलेजला भेट देत पाहणी केली होती. यावेळी कॉलेजची शिक्षण प्रणाली, सर्व सुविधा, प्रत्येक विभागातील कागदपत्रांची तपासणी केली होती. यामध्ये टिचींग-लर्निग प्रोसेस, रिसर्च अँड कन्सल्टन्सी, स्टुडंट सक्सेस रेट,करिअर गाईडन्स,प्लेसमेंट,आऊटकम बेस्ड एज्युकेशन,पायाभूत सुविधा, विद्यार्थी,पालक व इंडस्ट्रीयालीस्ट यांचे अभिप्राय इ.गोष्टींचे मूल्यमापन केले. याचबरोबर वर्कशॉप, ग्रंथालय,ऑफीस, जिमखाना,कॅन्टीन, विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट्स तीनही विभागाच्या लॅब्स आणि तेथील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती.
या मानांकनामुळे भोसले पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना विविध ठिकाणी नोकरीमध्ये प्राधान्य, देशात व परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवेशाची संधी तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. वॉशिंग्टन ॲकॉर्ड अंतर्गत येणा-या सर्व योजनांचा फायदा संस्थेला पर्यायाने विद्यार्थी व शिक्षकांना उपलब्ध होणार आहे. या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना कॉलेजचे प्राचार्य गजानन भोसले म्हणाले की, भोसले पॉलिटेक्निकने स्थापनेच्या पहिल्या दिवसापासूनच शैक्षणिक दर्जा उच्च ठेवला आहे. विद्यार्थी, शिक्षक व संचालक मंडळ यांच्या सहकार्य व पाठबळामुळे संस्थेला हे यश मिळाले आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानात पारंगत करण्याचे काम संस्था करीत आहे. एनबीए मानांकनामुळे या कामाला उत्कृष्टतेचे प्रमाणपत्रच मिळाले आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ॲड.अस्मिता सावंतभोसले व सचिव संजीव देसाई यांनी या अभिमानास्पद कामगिरीबद्दल सर्वांचे कौतुक केले. मूल्यांकन प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल प्राचार्य गजानन भोसले, एनबीए समन्वयक सुनेत्रा फाटक, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात आले