सावंतवाडीतील अधिकार्यांना घेराव; मळगावसाठी आणखी एक वायरमनची मागणी…
सावंतवाडी,ता.०७: कोरोनाच्या काळात विज वितरण कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली विज बिले भरमसाठ रक्कम आकारुन देण्यात आली आहे. त्यामुळे या देयकामध्ये आकारण्यात आलेले विविध कर रद्द करा,अन्यथा आम्ही बीले भरणार नाही,असा इशारा आज मळगाव ग्रामस्थांच्या माध्यमातून विज अधिकार्यांना देण्यात आला.तसेच मळगाव हे तीन गावात विभागलेेले असल्यामुळे अनेक सेवा देताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे आणखी एक वायरमन वाढवून देण्यात यावा,अशी सुध्दा मागणी यावेळी करण्यात आली.
येथील विज अधिकारी अनिल यादव यांना आज ग्रामस्थांकडुन घेराव घालण्यात आला. दरम्यान जोपर्यत हा बिलाचा आकडा कमी केला जात नाही,तो पर्यत आम्ही बिले भरणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.यावेळी गणेशप्रसाद पेडणेकर,निळकंठ बुगडे,पांडुरंग हळदणकर,अशोक बुगडे,महेंद्र पेडणेकर,नंदकीशोर सावळ,महादेव हरमलकर,प्रसाद तळकटकर,शिवराम नेमळेकर,व्यंकटेश तळकटकर,महादेव तळकटकर,नारायण मेस्त्री,दिप्ती तळकटकर,अनिता तळकटकर आदी उपस्थित होते.