बिळवस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मानसी पालव यांची बिनविरोध निवड..

2

मसुरे, ता. २९ : बिळवस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मानसी लक्ष्मण पालव यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. के. जाधव यांनी काम पाहिले.
बिळवस ग्रामपंचायतच्या सरपंच रूपाली नाईक यांचे अपघाती निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवरती प्रशासनाने आज पोटनिवडणूक जाहीर केली होती. या रिक्त जागेवरती मानसी पालव यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे सरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. हे सरपंच पद इतर मागासवर्गीय महिला असे आरक्षित होते. उर्वरित चार वर्षे अजून कार्यकाल शिल्लक असल्यामुळे नूतन सरपंच यांना चांगले काम करता येणार आहे.
मसुरे डांगमोडे ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन गतवर्षी बिळवस ग्रामपंचायत उदयास आली होती. यावेळी या ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच म्हणून रूपाली नाईक यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यांनी आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला होता. दोन महिन्यापूर्वी रुपाली नाईक यांचा दुचाकीने जात असताना मृत्यू झाला होता. यामुळे ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त झाले होते. त्यानंतर प्रशासनाने या रिक्त सरपंच पदाची निवडणूक जाहीर केली होती. यावेळी मानसी पालव यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज असल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी उपसरपंच समीक्षा आगणे, ग्रामपंचायत सदस्य संतोष पालव, चैताली भोगले, रंजना पालव, श्री. सनये, ग्रामसेवक युगल प्रभूगावकर, नागेश भोगले, तातू भोगले, गोपाळ पालव, भास्कर पालव, मनोज पालव, अजित पालव, समीर पालव, भावेश पालव, विकास सावंत, अरविंद पालव, रमेश पालव, भाई सावंत, अशोक सावंत, कृष्णकुमार पालव, राम पालव, लक्ष्मण पालव, शार्दुल पालव, महादेव ऊर्फ अाबा पालव, अजय पालव, बाबुराव भोगले आणि ग्रामपंचायत सदस्य सर्व कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी नूतन सरपंच मानसी पालव म्हणाल्या की, गावचा विकास हा सर्वांना सोबत घेऊन करण्यात येईल. उर्वरित विकासात्मक प्रश्न सोडविण्यासाठी आपण त्या त्या भागातील ग्रामस्थांना सोबत घेऊन ते सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. ग्रामस्थ सर्व ग्रामपंचायत सदस्य, वरिष्ठ जाणकार, अधिकारी वर्ग, लोकप्रतिनिधी यांच्याशी एकदिलाने काम करून बिळवस ग्रामपंचायत राज्यात आदर्श ठरेल अशाप्रकारे काम करण्याचा आपला मानस आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मानसी पालव यांचा सत्कार करण्यात आला.

11

4