कणकवलीत शिवसेना पदाधिकार्यांकडून घोषणाबाजी;कायद्याची कठोर अंमलबजावणीची मागणी…
कणकवली, ता.१ ः उत्तरप्रदेशमध्ये दलित युवतीवर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनीच त्या युवतीच्या मृतदेहावर परस्पर अंत्यसंस्कार केले. या कृतीचा आज शिवसेना पदाधिकार्यांनी कणकवलीत निषेध केला. तसेच भाजप आणि उत्तरप्रदेश सरकार विरोधात घोषणाबाजीही केली.
येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर शिवसेना पदाधिकार्यांनी एकत्र येऊन भाजप आणि उत्तर प्रदेश सरकारचा निषेध केला. यावेळी शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, वैदेही गुडेकर, माधवी दळवी, नगरसेविका मानसी मुंज, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, शिवसेना गटनेते सुशात नाईक, नगरसेवक कन्हया पारकर, युवा सेना जिल्हाप्रमुख गीतेश कडू, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, योगेश मुंज, ललित घाडीगावकर, वैभव मालंडकर, रमेश चव्हाण, राजू राणे, राजन म्हाडगुत, विलास गुडेकर आदी उपस्थित होते.
केंद्रात व उत्तरप्रदेशमध्ये भाजप सरकार असूनही तेथे महिला सुरक्षित नाहीत. उत्तरप्रदेश येथे एका दलित युवतीवर सामुदायिक अत्याचार करून तिच्यावर पोलिसांनीच परस्पर अंत्यसंस्कार केले. त्या युवतीवर झालेल्या अत्याचारानंतरही त्या युवतीच्या कुटुंबीयांची परवड थांबली नाही. निर्भया प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचार थांबतील अशी अपेक्षा होती, पण भाजपा सरकार महिलांवरील हा अत्याचार थांबवू शकले नाही. महिलांवर होणार्या सामुदायिक अत्याचाराच्या घटना येत्या काळात थांबवण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे. महिलांना सुरक्षित वाटण्यासाठी सरकारकडून अंमलबजावणी होण्याची गरज असल्याचे शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत यांनी सांगत भाजपाच्या केंद्र उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला.