जिल्हाधिकार्यांना निवेदन; मंदिर बंद झाल्याने उपासमारीची वेळ…
कणकवली, ता.१: कोरोना महामारीमुळे राज्यातील मंदिरे बंद झाली. यात पुजार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे गुरव समाजाला राज्य शासनाने विशेष आर्थिक पॅकेज द्यावे अशी मागणी अखिल भारतीय गुरव समाज संघटनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. यामागणीचे निवेदन आज गुरव समाज संघटनेच्यावतीने जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
गुरव समाज बांधवांना शासनाने पॅकेज किंवा आर्थिक मदत न केल्यास आंदोलन करण्यास इशारा अखिल गुरव समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय सावंत-गुरव यांनी दिला आहे. जिल्हाधिकार्यांना निवेदन देताना गुरव संघटनेचे राज्य युवा मानद अध्यक्ष महेश गुरव, महिला अध्यक्ष सायली गुरव, जिल्हा युवा अध्यक्ष सदाशिव गुरव, कणकवली तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुरव, गुरुनाथ गुरव, वैभववाडी तालुकाध्यक्ष रमेश गुरव, कुडाळ तालुकाध्यक्ष अभिनव गुरव, सत्यवान गुरव, चंद्रकांत गुरव ,संतोष गुरव, संतोष गुरव, संदीप जाधव, पंढरीनाथ गुरव ,नीलेश गुरव ,योगेश गुरव, शशांक गुरव, प्रसाद गुरव, प्रथमेश गुरव आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले की, राज्यात ३० लाखाच्या आसपास गुरव समाज बांधव आहेत. यातील बहुतांश जण देवाचे पुजारी आहेत. कोरोना काळात या समाज बांधवांना मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्याअनुषंगाने अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने तीन वेळा आझाद मैदानावर आंदोलने करण्यात आली. तसेच अनेक वेळा राज्य शासनाला निवेदने देण्यात आली. मात्र त्याबाबतची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आता आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही.
गुरव समाजाच्या प्रमुख मागण्यांमध्ये गुरव समाजाला अर्थसाहाय्य करणे, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई इनाम कसणार्यांच्या नावाने मिळावी, इनाम वर्ग ३ जमिनीवर पीककर्ज उपलब्ध करून द्यावे. इनाम वर्ग जमिनी खालसा करून तसेच बेकायदेशीर हस्तांतरण व कुळ काढून मूळ सनद धारकांना देण्यात याव्यात. परंपरागत पूजा, अर्चा व उत्पन्नाचा परंपरागत हक्क कायम ठेवावा. गुरव समाजातील युवक युवर्तीना महिलांना उद्योग उभारणीसाठी विशेष आर्थिक पॅकेज द्यावे. प्रत्येक जिल्ह्याची ठिकाणी वसतिगृहासाठी जागा आणि निधी उपलब्ध करून द्यावे आदी प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.